पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर तीन जण सुखरूप आहेत. सध्या पुण्यात मुसळधार पाऊस पडत असून वारेही जोरात वाहत असल्याचे सांगण्यात येत आहे. जोराचा वारा किंवा खराब हवामानामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेबाबत एसपी पंकज देशमुख यांचे वक्तव्य समोर आले आहे. देशमुख म्हणाले, पुण्यातील पौड गावाजवळ खासगी हेलिकॉप्टर कोसळले आहे. हे हेलिकॉप्टर एका खासगी विमान कंपनीचे होते. ते हेलिकॅप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते.
प्रत्यक्षदर्शी म्हणाला, 'ही अतिशय धोकादायक घटना होती'
या घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने वृत्तसंस्थेशी संवाद साधला. हा अपघात झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी कमलेश सोलकर तेथे उपस्थित होते. सोलकर म्हणाले, हेलिकॉप्टर खाली पडल्याचे मी पाहिले. हेलिकॉप्टर खाली पडताच मी त्याच्या जवळ गेलो. मी हेलिकॉप्टर पायलटशी बोललो. तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता. तो घाबरला होता आणि लोकांना हेलिकॉप्टरपासून दूर जाण्यास सांगत होता कारण हेलिकॉप्टरचा कधीही स्फोट होऊ शकत होता.
पावसामुळे अपघात झाला का?
सोलकर म्हणाले, “ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा खूपच लहान आहे. तिथे जाणे खूप अवघड आहे. मी रस्त्यापासून खूप दूर होतो. गेल्या दोन दिवसांपासून इथे मुसळधार पाऊस पडत आहे, मला वाटतं कदाचित यामुळे काहीतरी घडलं असावं पण ही एक अतिशय धोकादायक घटना होती. मला बीपीचा त्रास आहे आणि अपघात पाहून मी घाबरलो. त्यामुळे मी लगेच तिथून पळ काढला.
हेलिकॉप्टर AW 139 आणि पायलटचा तपशील समोर आला आहे. हे हेलिकॉप्टर ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीचे आहे. आनंद असे जखमी कॅप्टनचे नाव असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या हेलिकॉप्टरमध्ये दीर भाटिया, अमरदीप सिंग आणि एसपी राम नावाचे आणखी तीन जण होते.
आणखी वाचा -
भारताच्या नौदलाची ताकद वाढणार, अमेरिकेकडून मिळणार 'हे' अत्याधुनिक शस्त्र