नागपूरच्या भोसलेंची ऐतिहासिक तलवार ताब्यात, ४७ लाखांत लंडनमधून घेतली विकत

Published : Apr 30, 2025, 03:34 PM ISTUpdated : Apr 30, 2025, 03:57 PM IST
Devendra Fadnavis

सार

महाराष्ट्र सरकारने लंडनच्या लिलावातून रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ४७.१५ लाख रुपयांना खरेदी केली. छत्रपती शाहू महाराजांनी बहाल केलेल्या सेनासाहिबसुभा या उपाधीने सन्मानित रघुजी भोसले यांच्या शौर्याची ही तलवार आता महाराष्ट्रात परतली आहे.

एका ऐतिहासिक निर्णयात महाराष्ट्र राज्य सरकारने नागपूरच्या भोसले घराण्याची अनमोल तलवार लंडनमधील लिलावातून विकत घेतली आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सेनासाहिबसुभा ही उपाधी मिळवलेले रघुजी भोसले यांच्या या तलवारीला इतिहासात मोठं स्थान आहे. ही तलवार आता परत महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून, यासाठी राज्य सरकारने ४७.१५ लाख रुपये मोजले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली असून, तलवारीचे फोटोही पोस्ट करत त्यांनी या ऐतिहासिक पुनर्प्राप्तीचा गौरव व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

“नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमधील लिलावात विक्रीसाठी आली होती. ही तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या मराठा इतिहासातील एक मौलिक ठेवा आता पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे,” असं फडणवीस यांनी अभिमानपूर्वक सांगितलं.

रघुजी भोसले कोण होते?

रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांच्या शौर्याने प्रभावित होऊन शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही मानाची उपाधी बहाल केली होती. रघुजी भोसले यांनी १७४५ च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्ध नेत्त्व करत मराठा साम्राज्याचा विस्तार बंगाल, ओडिशा आणि दक्षिण भारतापर्यंत केला होता. राजकीय आणि लष्करी दोन्ही आघाड्यांवर त्यांचा प्रभाव प्रस्थापित झाला होता.

तलवारीची वैशिष्ट्ये आणि लंडनपर्यंतचा प्रवास

ही तलवार मराठा शैलीतील फिरंगी प्रकारातील असून तिचे पाते एकधारी आणि अत्यंत नाजूक सोन्याच्या नक्षीकामाने सजवलेले आहे. या तलवारीच्या पात्याच्या पाठीवर "श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा" असे सोन्याच्या पाण्याने कोरलेले आहे. युरोपियन बनावटीच्या या तलवारीचे पाते त्या काळात प्रचलित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, १८१७ मध्ये नागपूरमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्यावर हल्ला करत लूट केली होती, त्याच वेळी ही तलवार इंग्रजांनी घेऊन गेल्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात.

खरेदी प्रक्रियेची पार्श्वभूमी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, विभागाचे अपर मुख्य सचिव आणि माझ्या कार्यालयातील विकास खारगे यांनी या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. काही तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर ही तलवार एका मध्यस्थामार्फत खरेदी करण्यात आली.” या ऐतिहासिक संपत्तीच्या पुनर्प्राप्तीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक नवसंजीवनी प्राप्त झाली आहे, आणि मराठा साम्राज्याचा शौर्यवारसा पुन्हा एकदा आपल्या मातीत परत आला आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

महाराष्ट्रातील 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, शासकीय कार्यालयांना 24 सुट्ट्या, बॅंका आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 1 दिवस जास्तीची सुटी!
Maharashtra : बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी सरकारची नवी रणनीती; जंगलात सोडल्या जाणार 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या