"छत्रपती शिवराय माझे दैवत, तुलना अशक्यच!" वादावर पडदा टाकत हर्षवर्धन सपकाळ यांनी मागितली शिवप्रेमींची माफी

Published : Feb 17, 2026, 07:17 PM IST
harshwardhan sapkal

सार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबद्दल फेसबुक पोस्टद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असून, महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून चर्चेत असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगत, त्यांनी तमाम शिवप्रेमींची फेसबुक पोस्टद्वारे मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त केली आहे.

"मी तुलना केलीच नाही!", सपकाळ यांचे स्पष्टीकरण

हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. माझ्या ७० सेकंदांच्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सरकारी कार्यालयांत महापुरुषांचे फोटो लावल्याने समाजात ऐक्य निर्माण व्हावे, हाच माझ्या विधानाचा मूळ उद्देश होता."

वक्तव्याचा नेमका संदर्भ काय?

सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

प्रेरणास्थान: टिपू सुलतानांनी महाराजांच्या पराक्रमातून प्रेरणा घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला, असे मी म्हटले होते, तुलना केली नव्हती.

संविधानाचा दाखला: भारताच्या मूळ संविधानातही टिपू सुलतानांची तसबीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक सलोखा: इतिहासावर मतभेद असू शकतात, पण त्यावरून समाजात तेढ निर्माण होऊ नये, हीच माझी भूमिका होती.

भाजपवर डागली सडकून टीका

या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असताना सपकाळ यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. "भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी हा अपप्रचार करून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुण्यात झालेला प्रकार याच गलिच्छ राजकारणाचा भाग होता," अशी टीका त्यांनी केली. भाजपच्या या 'विकृती' विरोधात आपण लढत राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आवाहन

दोन दिवसांवर आलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधत त्यांनी जनतेला आवाहन केले की, "कोणाच्याही भावना दुखावणं हा माझा हेतू नव्हता. माझ्या शब्दांचा गैरवापर झाल्यामुळे ज्या शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आपण सर्वांनी अपप्रचाराला बळी न पडता महाराजांनी दिलेला सहिष्णुतेचा मार्ग स्वीकारावा."

सपकाळ यांनी आपल्या पोस्टचा शेवट संत तुकारामांच्या 'भले तरी देऊं कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणूं काठी' या प्रसिद्ध अभंगाने करत विरोधकांना इशाराही दिला आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक