
देहूगाव: आषाढी वारीच्यानिमित्ताने संपूर्ण देहूनगरी भक्तिरसात न्हालेली आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाची तयारी शिगेला पोहोचली असून, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष अवघ्या देहूत घुमू लागला आहे. भाविकांचे ओसंडून वाहणारे प्रेम, टाळ-मृदंगाच्या निनादात गुंजणारी दिंड्या, आणि संपूर्ण नगरीत फुलांनी सजलेली मंदिरे, रस्ते, गल्लीबोळ या भक्तिमय वातावरणाने अवघं शहर जणू वैकुंठात परावर्तित झालं आहे.
या सोहळ्यासाठी प्रशासन, संस्थान व स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून अत्यंत व्यापक तयारी करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, येलवाडीतील भागीरथीमाता मंदिर, विठ्ठलनगर व चिंचोली परिसरात भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय. मंदिराचा कळस फुलांनी सजवला असून, सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा संगम दिसतो आहे.
संपूर्ण पालखी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, यासाठी प्रत्येक दिंडीचे चालक, फडकरी आणि मालक यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पालखी रथासाठी विशेष जनरेटर आणि नवी विद्युत व्यवस्था उभारण्यात आली आहे. रथाच्या ब्रेक सिस्टीम व ग्रिसिंगची तपासणी पूर्ण झाली आहे. वाहतूक पोलिसांनी आरटीओमार्फत सर्व वाहनांची तपासणीही करून घेतली आहे.
देहूगावात विविध ठिकाणी उंच टॉवर्सवर प्रकाशयोजना करण्यात आली आहे. पदपथांवर फ्लडलाइट्स लावण्यात आल्या आहेत. महावितरणकडून अखंड विद्युत पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे.
नगरपंचायत व स्वकाम सेवा संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मंदिर परिसर व रस्त्यांची स्वच्छता सुरु आहे. १२०० तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात आली असून, उघडी गटारे बंद करण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून अधिकृत टँकरची व्यवस्था आहे. आरोग्य विभागाने अधिकृत टँकरवरूनच पाणी घेण्याचे आवाहन केले आहे.
श्रीसंत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ व इतर सेवाभावी संस्थांकडून हजारो वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान सुरू आहे. या सेवाकार्यामुळे वारकऱ्यांना अपार समाधान मिळत आहे.
इंद्रायणी नदी घाटावर एनडीआरएफची तुकडी आणि जीव रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मुक्कामस्थळी आणि मुख्य मार्गांवर एकूण ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी तीन सहायक पोलीस आयुक्त, १५ निरीक्षक, ४३५ पोलीस अंमलदार आणि १३४ होमगार्ड तैनात आहेत.
विशेष पार्किंग व्यवस्था आणि पीएमपीएमएल, एसटी बसद्वारे आळंदी, मनपाभवन, निगडी, देहूरोडकडे वाहतूक सुलभ करण्यात आली आहे. दर्शनासाठी धातुशोधक यंत्रे व शिस्तबद्ध रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.
गावातील रुग्णालयांत खास बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. गाथा मंदिर, मुख्य मंदिर व वैकुंठगमन परिसरात बाह्यरुग्ण सेवा सुरू असून, १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका, कार्डियाक ॲम्बुलन्स सज्ज आहेत.
पालखीची पारंपरिक सजावट करण्यात आली आहे. नव्याने खरेदी केलेल्या गोंडे, गाद्या, तक्के, कपडे सेवेकऱ्यांच्या हस्ते पालखी, अब्दागिरी आणि गरूडटक्का यांना लावण्यात आले आहेत. मानाचे भोई, चोपदार, म्हसलेकर दाखल झाले असून, सेवाभावाच्या या परंपरेत अगदी मनोभावे सहभागी झाले आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या निधनानंतर काही वर्षांनी, इ.स. १६८५ मध्ये, त्यांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी एक पवित्र परंपरा सुरू केली. त्यांनी देहू येथून आपल्या वडिलांच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेवून त्या पंढरपूरकडे नेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या पालखीबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा सहभागी होत होती. आणि तेव्हापासून, या दोन महान संतांच्या पालख्या निघत आहेत, भक्तांच्या महासागरासह प्रेम, भक्ती आणि समतेचा संदेश देत.
तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, तो महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा आत्मा आहे. हजारो वारकरी पारंपरिक वेषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग म्हणत, विठोबाच्या दर्शनासाठी चालत जातात. ही वारी विविध जाती, धर्म, वयोगट आणि पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र आणते भक्ती, एकता आणि समतेचा जिवंत अनुभव देत.