Operation Sindoor "अभी पिक्चर बाकी है" माजी लष्करप्रमुख नरवणे यांचा सूचक इशारा

Published : May 07, 2025, 11:15 AM ISTUpdated : May 07, 2025, 11:43 AM IST
general narvane

सार

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या आधारभूत ठिकाणांवर भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी एका सूचक पोस्टद्वारे पाकिस्तानला इशारा दिला आहे.

मुंबई - पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या आधारभूत ठिकाणांवर भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी एका सूचक पोस्टद्वारे पाकिस्तानला इशारा दिला आहे. “अभी पिक्चर बाकी है” असं त्यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलं असून, या संदेशामागे अधिक कारवायांची शक्यता असल्याचं सूचित होत आहे.

या कारवाईनंतर भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी राजनाथ सिंह भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या प्रमुखांशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून ही कारवाई “युद्धाची कृती” असल्याचे म्हटले गेले असून, “योग्य प्रत्युत्तर” दिलं जाईल असं पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

ऑपरेशन सिंदूर, सीमापार निर्णायक कारवाई

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेला होता. या क्रूर हल्ल्याला उत्तर देताना भारताने बुधवारी रात्रीच्या अंधारात 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ उच्च-मूल्य असलेल्या दहशतवादी केंद्रांवर अचूक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ला केला.

या कारवाईत भारतीय हवाई दलाने प्रिसीजन गाईडेड मिसाइल्स (अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे) वापरून दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केलं. या ठिकाणांवरून भारतात हल्ला घडवून आणण्याच्या योजना आखल्या जात होत्या, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

संयमित आणि मोजकं उत्तर, भारताचा स्पष्ट संदेश

भारत सरकारने स्पष्ट केलं आहे की, या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही. “हे उत्तर संयमित आणि मोजकं असून, त्याचा उद्देश केवळ दोषींना लक्ष्य करणं आहे, युद्ध भडकवणं नव्हे,” असं संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत एक्स हँडलवरून सांगण्यात आलं.

ही कारवाई भारताच्या दहशतवादविरोधी धोरणात एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे. या कारवाईने भारताने जागतिक स्तरावर पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही.

पुढे काय? नरवणे यांचा सूचक संदेश

माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी "अभी पिक्चर बाकी है" या वाक्याने पोस्ट करत सूचित केलं आहे की ही कारवाई केवळ सुरुवात आहे. पाकिस्तानकडून जर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली गेली, तर भारत त्याला अधिक तीव्र उत्तर देण्यास सक्षम आणि सज्ज आहे, असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी दिला आहे.

PREV

Recommended Stories

प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!