महाराष्ट्राला बेघरमुक्त करण्यासाठी १० लाख घरांना मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीस

Published : Apr 27, 2025, 09:31 AM IST
devendra phadanvis

सार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य बनवण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १० लाख घरांना मंजुरी मिळणार असल्याचे जाहीर केले. 

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी १० लाख घरांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात यशदा येथे आयोजित ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.

कार्यशाळेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, “घर मंजूर झाल्यानंतर जमीन उपलब्ध करणे ही प्राथमिकता आहे. एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी मोहीम राबवली पाहिजे. राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य बनवायचे आहे.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचे आवाहन केले. “मनुष्यबळाचे प्रभावी व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधणे हे काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.

प्रधानमंत्री आवास योजनेसोबतच सौरऊर्जा सुविधांचा समावेश करून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत घरांमध्ये वीज उपलब्ध करून देण्याचेही ते म्हणाले. यासाठी विविध योजनांमधून निधी आणि मनुष्यबळ उभे करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्य शासनाने सुरू केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात ग्रामविकास विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. “१२,५०० कार्यालयांमध्ये सुधारणा घडवून आणताना कामकाजात पारदर्शकता वाढली आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम अधिकारी पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. “प्रत्येक ५ किमी अंतरावर दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, ‘लखपती दीदी’ योजनेद्वारे महिलांना सक्षम बनवून आर्थिक परिवर्तन साधले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामविकास विभागाने तयार केलेल्या सिंगल युनिफाईड पोर्टल, आवास वितरण ॲप, भूमिलाभ पोर्टल आणि विविध डॅशबोर्ड्सचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच, नवोपक्रमांवर आधारित पुस्तिका आणि महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव, यशदाचे महासंचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक