
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामात भाजपने ९९ जागा जिंकत 'नंबर १' चा पक्ष म्हणून मोठी झेप घेतली आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिळवलेल्या या यशानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
मुंबईचा निकाल स्पष्ट होताच नितेश राणे यांनी सोशल मीडियावर २२ सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त जोरजोरात हसताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी "उद्धवजी आणि पेंग्विनला... जय श्री राम!" असे कॅप्शन देत ठाकरेंना जबरदस्त डिवचले आहे. त्यांच्या या 'हास्यबाणा'ची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे अधिकच आक्रमक झाले. ते म्हणाले की, "आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भगवा झंझावात आला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी आता संध्याकाळी इस्लामाबादची फ्लाईट पकडावी आणि तिथेच जाऊन 'अल्लाहू अकबर' म्हणावे." जिहादी मानसिकतेला मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत (११४) मिळाले नसले तरी, भाजपने सर्वाधिक जागा जिंकून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे खेचल्या आहेत.
पक्ष विजयी जागा
भारतीय जनता पक्ष (BJP) ९९
शिवसेना (ठाकरे गट) ६३
शिवसेना (शिंदे गट) ३१
काँग्रेस १४
मनसे (राज ठाकरे) ०९
राष्ट्रवादी काँग्रेस ०२
इतर / अपक्ष ०९
ठाकरे गटाला केवळ ६३ जागांवर समाधान मानावे लागल्याने मुंबईतील त्यांची अनेक वर्षांची सत्ता संकटात आली आहे. दुसरीकडे, महायुतीमधील शिंदे गट (३१ जागा) आणि भाजप (९९ जागा) एकत्र आल्यास त्यांचा आकडा १३० वर पोहोचतो, जो बहुमतासाठी पुरेसा आहे. त्यामुळे आता मुंबईचा नवा महापौर भाजप-महायुतीचाच असेल, हे जवळपास निश्चित झाले आहे.