
Navneet Rana Receives Gang Rape and Death Threats : नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची आणि सामूहिक बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी स्पीड पोस्टने त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवण्यात आली आहे. यामध्ये गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहा, असे स्पष्टपणे लिहिले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची तयारी सुरू केली आहे.
नवनीत राणा यांना हे पत्र हैदराबाद येथील जावेद नावाच्या व्यक्तीने पाठवले आहे. यामध्ये आरोपीने अत्यंत घाणेरड्या भाषेत आक्षेपार्ह आणि अश्लील गोष्टी लिहिल्या आहेत. पत्र मिळाल्यानंतर राणा यांचे स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पत्राच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर नवनीत राणा यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी खासदार असतानाही त्यांना अनेकदा अशा धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, यावेळी हे प्रकरण अधिक गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. दिवाळीनंतर मिळालेल्या या धमकीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी या धमकीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नवनीत कौर राणा सध्या महाराष्ट्रात राहतात, पण त्या मूळच्या पंजाबच्या आहेत. त्या एक यशस्वी अभिनेत्रीही राहिल्या आहेत. त्यांना तेलुगू चित्रपटसृष्टीतील कामासाठी ओळखले जाते. त्यांनी हिंदी, दाक्षिणात्य आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीमधून अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचे पती रवी राणा हे देखील एक राजकारणी आहेत.