
बीड : बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे. निमित्त ठरलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) बॅनर्सचं, ज्यावर सर्व मोठ्या नेत्यांचे फोटो झळकत असताना धनंजय मुंडे यांचा फोटो मात्र कुठेही दिसत नाही. हे बॅनर समोर येताच बीडमध्ये राजकीय चर्चेला चांगलाच उधाण आलं आहे.
७ ऑगस्ट रोजी वडवणी (जि. बीड) येथे भाजपाचे नेते राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
सदर सोहळ्याची माहिती देणारे बॅनर बीडमध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर प्रमुख नेते - अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, रुपाली चाकणकर यांचे मोठे फोटो झळकतात. मात्र, याच जिल्ह्यातील एक महत्वाचा चेहरा असलेले धनंजय मुंडे यांचा फोटो मात्र या बॅनर्सवरून गायब आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर मागील काही महिन्यांपासून विविध आरोप करण्यात आले होते. कृषी खात्याच्या गैरव्यवहारापासून ते इतर वैयक्तिक प्रकरणांपर्यंत अनेक प्रकरणांनी त्यांचं नाव गाजलं. परिणामी, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची तब्यत बिघडली आणि काही काळ ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले.
या सर्व घडामोडींनंतरच आता बॅनरवरून त्यांची अनुपस्थिती अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः त्यांच्याच जिल्ह्यात हे घडणं, हे राजकीय पातळीवर नवे संकेत देतं का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बॅनर्समध्ये बाबरी मुंडे यांचं नाव आणि फोटो, अजित पवार, प्रकाश सोळंके यांचे मोठे फोटो, तसेच इतर वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती ठळकपणे दिसते. मात्र, राष्ट्रवादीत गेल्या काही वर्षांत बळकट भूमिका बजावलेले आणि बीड जिल्ह्याचे कणा मानले जाणारे धनंजय मुंडे यांचा उल्लेखही नाही हे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरत आहे.
धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे आघाडीचे नेते मानले जातात. अशा स्थितीत त्यांचाच जिल्हा आणि त्यांच्याच नातेवाईकांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या प्रचार बॅनरवर त्यांची अनुपस्थिती ही एक गंभीर राजकीय भाषा बोलत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीने बीडच्या राजकारणात अनेक शक्यता आणि चर्चा रंगू लागल्या आहेत. बॅनरवरून गायब झालेला एक चेहरा, राजकीय परिप्रेक्ष्यात एखाद्या मोठ्या पावलाचं संकेत ठरतोय का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल.