बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वतःवर झाडल्या गोळ्या, आत्महत्या की एन्काऊंटर?

बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी अक्षय शिंदेने पोलिस कोठडीत असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून एका पोलिस कर्मचाऱ्यालाही दुखापत झाली आहे.

Rameshwar Gavhane | Published : Sep 23, 2024 2:19 PM IST

बदलापूरमध्ये शाळेतील लहानमुलींवर अत्याचार प्रकरणात अटक असलेला आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या बंदुकीतून अक्षयने स्वतःवर गोळी चालवली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. अक्षयला वाचवण्यासाठी गेलेला एक पोलिस देखील गंभीर जखमी झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय याचा मृत्यू झाला आहे.

आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर झाडल्या गोळ्या 

अक्षय याला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने एका पोलिसाची बंदूक त्याने हिसकावली. आणि स्वतःवर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या डोक्याल देखील लागली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. दोन दिवसापूर्वी अक्षयने त्याच्यावरील सर्व आरोप मान्य केले होते. दरम्यान ही आत्महत्या नसून पोलिसांनी केलेला एन्काऊंटर असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. अक्षय शिंदे हा तळोजा कारागृहात होता. त्याला एका दुसऱ्या गुन्ह्यात ठाणे येथे चौकशीसाठी तळोजा येथून नेत असताना पोलिसांची बंदूक हिसकाऊन स्वतःवर गोळ्या झाडल्या.

अक्षय हा बदलापूरमधील एका नामांकित शाळेत कंत्राटी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याने शाळेतील चार आणि सहा वर्षांच्या दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. 16 ऑगस्ट रोजी दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी दुपारी १२ वाजता बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आली नाही. गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते. चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठा उद्रेक झाला होता. नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरत रास्ता रोको केला होता.

आत्महत्या की एन्काऊंटर?

अक्षयला तळोजा कारागृहातून घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावली. त्यावेळी पोलिसांनी स्वरक्षणासाठी अक्षयवर गोळीबार करत त्याचा एन्काऊंटर केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Share this article