
हाडांची काळजी घेण्यापासून ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यापर्यंत दह्याचे अनेक फायदे आहेत. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी सांगतात की, दह्यातील जिवंत सूक्ष्मजीव आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे चांगले बॅक्टेरिया पुरवतात. दही तयार करण्याच्या प्रक्रियेत लॅक्टोज बऱ्याच प्रमाणात तुटते आणि दह्यातील सूक्ष्मजीव उरलेले लॅक्टोज पचवण्यास मदत करतात.
दही कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहे. यामुळे हाडं आणि दातांचे आरोग्य चांगले राहते आणि शरीराची सामान्य कार्यक्षमता वाढते. काही विशिष्ट प्रकारचे दही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि आतड्यांच्या अस्तराचे कार्य सुधारण्यास मदत करते.
दह्यामध्ये शरीराला लागणारे नऊ अत्यावश्यक अमिनो ॲसिड असतात, हा याचा आणखी एक मोठा फायदा आहे. यातील प्रोटीनमुळे पोट भरलेले राहते आणि स्नायूंना ताकद मिळते. साखर न घातलेले ग्रीक योगर्ट हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. यामध्ये भरपूर प्रोटीन असते आणि साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असते.
ग्रीक योगर्टमधील कॅल्शियम आणि प्रोटीन हाडांना बळकटी देतात. स्नायूंच्या आरोग्यासाठीही ते खूप चांगले आहे. एका कप ग्रीक योगर्टमध्ये सुमारे २० ग्रॅम प्रोटीन असू शकते. वयानुसार योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे महत्त्वाचे असते, कारण नियमित व्यायामासोबतच स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी ते मदत करते.