World Rabies Day 2026 : कुत्रा चावल्यावर घाबरू नका, सर्वात आधी करा 'ही' कामं

Published : Sep 28, 2026, 03:09 PM IST
World Rabies Day 2026 : कुत्रा चावल्यावर घाबरू नका, सर्वात आधी करा 'ही' कामं

सार

कुत्रा चावल्यावर होणारी जखम कदाचित छोटी वाटू शकते, पण रेबीजचा धोका टाळण्यासाठी सुरुवातीच्या काही मिनिटांत तुम्ही उचललेली पावलं तुमचा जीव वाचवू शकतात.

मुंबई : रेबीज या आजाराला मुळापासून संपवण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबरला 'जागतिक रेबीज दिन' पाळला जातो. या वर्षीची थीम आहे, "एकत्र आल्यावर आपण अधिक मजबूत होतो."

रेबीज हा प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरणारा एक अत्यंत घातक आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगात दर दहा मिनिटाला एका व्यक्तीचा रेबीजमुळे मृत्यू होतो. हा आजार रॅबडोव्हायरस कुटुंबातील लिसा रेबीज नावाच्या आरएनए (RNA) व्हायरसमुळे होतो.

कुत्र्याने चावा घेतल्यावर ती जखम वरवर छोटी वाटू शकते. पण रेबीजचा धोका लक्षात घेता, पहिल्या काही मिनिटांत तुम्ही काय करता, यावर तुमचा जीव वाचणं अवलंबून असतं. रेबीजचा व्हायरस थेट आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर (Central Nervous System) हल्ला करतो. एकदा का याची लक्षणं दिसायला लागली, की मृत्यू जवळपास निश्चित असतो. पण, कुत्रा चावल्यावर लगेच जखम स्वच्छ धुतली आणि वेळेवर रेबीज प्रतिबंधक लस (PEP) घेतली, तर हा मृत्यू नक्कीच टाळता येतो. जगभरात माणसांना होणाऱ्या रेबीजच्या ९९ टक्के प्रकरणांमध्ये कुत्रेच कारणीभूत असतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी तब्बल ९१ लाख लोकांना प्राणी चावल्याच्या घटना घडतात. २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, भारतात दरवर्षी ५,७२६ लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो.

कुत्रा चावल्यावर लगेच काय करावं?

जखम १५ मिनिटं पाण्याने धुवा

कुत्रा घरचा असो वा रस्त्यावरचा, त्याने चावा घेतल्यास सर्वात आधी ती जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. वाहत्या पाण्याखाली सलग १५ मिनिटं जखम धुणं गरजेचं आहे. यासाठी साधा साबण वापरला तरी चालतो, अँटीबॅक्टेरियल साबणच हवा असं काही नाही. कुत्र्याने फक्त ओरबाडलं असेल, तरीही जखम धुणं मस्ट आहे.

जखमेवर भलतेसलते उपाय नकोत

जखमेवर झाडांचा पाला, अर्क, ॲसिडिक/अल्कलाइन पदार्थ किंवा इतर कोणतेही घरगुती उपाय करू नका. या पारंपारिक उपायांनी रेबीज टळत तर नाहीच, उलट जखम आणखी चिघळू शकते आणि पेशींचं नुकसान होऊ शकतं.

लगेच डॉक्टरांना भेटा

वेळ न घालवता रेबीजवर उपचार करणाऱ्या जवळच्या क्लिनिक किंवा रुग्णालयात जा. कुत्र्यामध्ये रेबीजची लक्षणं दिसण्याची वाट अजिबात बघू नका, लगेच वैद्यकीय मदत घ्या.

जखम बांधून ठेवू नका

कुत्रा चावलेली जखम बँडेजने किंवा कापडाने घट्ट बांधून ठेवण्याची गरज नसते. ती उघडीच ठेवून रुग्णालयात जा. साधारणपणे पाच मिनिटांत जखमेतून रक्त येणं थांबतं. पण जर रक्तस्राव थांबत नसेल, तर एका स्वच्छ कापडाने जखमेवर थोडा वेळ दाब देऊन धरा.

घरात कुत्रा पाळला असेल तर त्याची विशेष काळजी घ्या. कुत्र्याला वेळेवर सर्व लसी द्या. तसेच, घरातील लहान मुलांना कुत्र्यासोबत खेळताना एकटं सोडू नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Shaking Legs While Sitting : खुर्चीवर बसून पाय हलवण्याची सवय आहे का? मग हे नक्की वाचा!
Egg Side Effects : दिवसाला किती अंडी खावीत? जास्त अंडी खाण्याचे तोटे माहितीयेत?