Weekend Headaches : वीकेंडलाच डोकं का दुखतं? जाणून घ्या यामागची कारणं

Published : Sep 21, 2026, 01:55 PM IST
Weekend Headaches : वीकेंडलाच डोकं का दुखतं? जाणून घ्या यामागची कारणं

सार

वीकेंडलाच डोकं जास्त का दुखतं? झोपेच्या वेळा बदलणं, चहा-कॉफीची सवय, पाणी कमी पिणं आणि रोजच्या दिनचर्येत होणारा बदल यामागे असू शकतो. वीकेंडच्या डोकेदुखीची नेमकी कारणं काय आहेत, ते समजून घेऊया.

मुंबई : बहुतेकांसाठी वीकेंड म्हणजे आराम करण्याचा, जास्त वेळ झोपण्याचा आणि कामाचा ताण विसरण्याचा काळ असतो. पण तरीही, काही लोकांना शनिवार किंवा रविवारच्या सकाळी उठल्यावर अचानक डोकं दुखण्याचा किंवा मायग्रेनचा त्रास होतो.

असं का होतं?

याला वीकेंड नाही, तर तुमच्या दिनचर्येत अचानक झालेला बदल कारणीभूत असू शकतो. जास्त वेळ झोपल्याने डोकं दुखू शकतं. आठवडाभर काम केल्यानंतर वीकेंडला जास्त वेळ झोपावंसं वाटणं साहजिक आहे. पण, झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेत मोठा बदल झाल्याने शरीराचं अंतर्गत घड्याळ बिघडू शकतं. खूप कमी किंवा खूप जास्त झोप घेतल्याने संवेदनशील लोकांना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

मेंदूला एका ठराविक वेळापत्रकाची सवय असेल, तर तो अधिक चांगल्या प्रकारे काम करतो. वीकेंडलाही रोजच्याच वेळेवर झोपल्यास आणि उठल्यास डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

सकाळची बेड कॉफीसुद्धा याला कारणीभूत असू शकते. जे लोक नियमितपणे चहा किंवा कॉफी पितात, त्यांच्यावर कॅफीनचा मोठा प्रभाव पडतो. कामाच्या दिवसांत तुम्ही सकाळी ७ किंवा ८ वाजता चहा-कॉफी घेत असाल. पण वीकेंडला उशिरा उठल्यामुळे ही वेळ टळते किंवा तुम्ही चहा-कॉफी घेणंच विसरून जाता.

तुमच्या शरीराला रोज कॅफीनची सवय असेल आणि त्यात अचानक बदल झाला, तर 'कॅफीन विथड्रॉवल'मुळे डोकं दुखू शकतं. याउलट, काही लोकांमध्ये जास्त कॅफीन घेतल्यानेही वारंवार डोकं दुखू शकतं. चहा किंवा कॉफीच्या किती प्रमाणामुळे हा त्रास होतो, हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं असतं.

यावर कायमस्वरूपी चहा-कॉफी सोडणं हा उपाय नाही. त्याऐवजी, रोजच्या प्रमाणात अचानक मोठे बदल करणं टाळलं पाहिजे. तुम्हाला कॅफीनचं प्रमाण कमी करायचं असेल, तर ते अचानक बंद न करता हळूहळू कमी करणं योग्य ठरेल.

आराम केल्यानेही कधीकधी मायग्रेन होऊ शकतो

या प्रकाराला 'लेट-डाऊन हेडेक' असं म्हणतात. स्ट्रेस हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे हा त्रास होतो. तणावाच्या वेळी शरीरातून कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन ही रसायने बाहेर पडतात. सततच्या तणावामुळे महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीतही असंतुलन निर्माण होतं.

आठवडाभर कामाच्या ताणामुळे शरीर एका वेगळ्याच तणावाखाली असतं. जेव्हा शुक्रवारची संध्याकाळ येते आणि हा ताण अचानक कमी होतो, तेव्हा या जलद बदलामुळे काही लोकांना मायग्रेनचा झटका येऊ शकतो. म्हणूनच, जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आराम करायला लागता, तेव्हाच तुमचं डोकं दुखायला सुरुवात होते.

वीकेंडला जेवण आणि पाण्याचं काय?

वीकेंडला दिनचर्या बदलते. नाश्ता उशिरा करणं, नाश्ता न करणं, जेवणाच्या वेळा पाळता न येणं, बाहेर जास्त फिरणं आणि पाणी कमी पिणं या गोष्टी घडतात. उपाशी राहणं आणि शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) ही डोकेदुखीची मुख्य कारणं आहेत. यामुळे मायग्रेनचा त्रास वाढण्याची शक्यता असते.

वीकेंडला डोकेदुखी टाळण्यासाठी काय करावं?

  1. तुमची वीकेंडची दिनचर्या आठवड्याच्या इतर दिवसांसारखीच ठेवण्याचा प्रयत्न करा.
  2. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा शक्यतो सारख्याच ठेवा.
  3. चहा-कॉफीचं प्रमाण अचानक वाढवण्यापेक्षा किंवा बंद करण्यापेक्षा ते नेहमीसारखंच ठेवा.
  4. ठराविक वेळेच्या अंतराने जेवण करा.
  5. दिवसभर भरपूर पाणी प्या. आठवड्याचे दिवस आणि वीकेंडलाही शक्यतो दिवसाला ३ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
  6. फक्त वीकेंडलाच आराम करण्यापेक्षा आठवडाभर थोडा-थोडा वेळ काढून आराम करा.
  7. तुमची डोकेदुखी कशामुळे वाढते हे ओळखण्यासाठी एक 'हेडेक डायरी' ठेवा, कारण प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात.
  8. सर्वांसाठी डोकेदुखीचं एकच कारण नसतं हे लक्षात घ्या. झोप, तणाव, कॅफीन, विशिष्ट जेवण, जेवण टाळणं, दिनचर्येतील बदल, पाण्याची कमतरता आणि वैयक्तिक संवेदनशीलता अशा अनेक कारणांमुळे डोकं दुखू शकतं.
  9. जर तुमची डोकेदुखी वारंवार होत असेल, पूर्वीपेक्षा जास्त तीव्र असेल आणि त्यामुळे तुमच्या रोजच्या कामात अडथळा येत असेल, तर पेनकिलरच्या गोळ्या घेण्यापेक्षा न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. कारण औषधांच्या अतिवापरामुळेही डोकं दुखू शकतं.
  10. जर डोकेदुखी खूप तीव्र असेल, अचानक सुरू झाली असेल किंवा त्यासोबत शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा, बोलण्यात अडचण, गोंधळ, फेफरे, दृष्टी जाणे किंवा अंधुक दिसणे, ताप अशी लक्षणे असतील, तर तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

थोडक्यात सांगायचं तर - 

रोजच्या दिनचर्येत सातत्य ठेवणं, ६ तासांची पुरेशी झोप घेणं, आराम करणं, डोकेदुखी वाढवणारी कारणं टाळणं आणि आठवड्याचे दिवस व वीकेंडला एकसारखंच वेळापत्रक पाळल्यास डोकेदुखीचा त्रास टाळता येऊ शकतो.

- हा लेख तिरुवनंतपुरम येथील किम्सहेल्थ (KIMSHEALTH) च्या न्यूरोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. संध्या मनोरेंज यांनी लिहिला आहे.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Navratri 2026: नवरात्रीत घर सजवायचंय? तोरण आणि रांगोळीच्या डिझाईनसाठी हे ५ AI प्रॉम्प्ट्स नक्की ट्राय करा
Food Safety : सणांनंतर उरलेली मिठाई आणि फराळ असाच ठेवताय? जीवावर बेतू शकतं!