
काही वेळा साप थेट आपल्या घरात शिरतात. याची अनेक कारणं असू शकतात. बऱ्याचदा बाथरुम किंवा टॉयलेटच्या ड्रेनेज पाईपमधून साप घरात येतात. कधीकधी तर वेस्टर्न कमोडमधूनही साप बाहेर आल्याच्या घटना घडल्या आहेत. पण टॉयलेटमध्ये साप का येतात? साप दिसल्यावर नेमकं काय करायचं? आणि यावर काय उपाय आहेत? हे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
टॉयलेटमध्ये साप पाहिला की कोणाचीही घाबरगुंडी उडेल. घरात साप कसा आला, या प्रश्नासोबतच मनात भीतीही निर्माण होते. पावसाळ्यात किंवा कडक उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत काय करायचं? विषारी सापापासून आपल्या कुटुंबाला कसं वाचवायचं? याच्या काही टिप्स खाली दिल्या आहेत.
तुमचं बाथरुम किंवा टॉयलेट अस्वच्छ आहे, म्हणूनच साप तिथे येतात असं नाही. घर आणि बाथरुम एकदम स्वच्छ असलं तरी साप येऊ शकतो. घराच्या अंडरग्राउंड ड्रेनेज पाईप्समध्ये नेहमी ओलावा असतो. तिथे झुरळं, उंदीर आणि इतर कीटक राहतात. याच भक्ष्याच्या शोधात साप अंडरग्राउंड पाईपमध्ये शिरतात.
काही वेळा उकाड्यापासून वाचण्यासाठी साप अंधाऱ्या आणि ओलसर जागा शोधतात. मेन ड्रेनेज लाईनला जोडलेल्या अंडरग्राउंड पाईपमधून ते आत शिरतात आणि थेट तुमच्या बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये पोहोचतात.
जाळीचा वापर: सापांना रोखण्यासाठी मेन ड्रेनेज लाईनला जोडलेल्या तुमच्या अंडरग्राउंड पाईपला मजबूत जाळी बसवा. तसंच बाथरुम आणि टॉयलेटमधील पाणी जाण्याच्या जागेवरही पक्की जाळी लावून घ्या.
घराभोवतीचा परिसर: तुमच्या घराच्या आजूबाजूला झुडपं किंवा अडगळीचं सामान असेल तर ते लगेच साफ करा. अशाच जागांवर साप जास्त लपून बसतात.
पाईप्स व्यवस्थित बंद करा: बाथरुम आणि टॉयलेटमध्ये जर कोणते उघडे पाईप्स असतील, तर ते व्यवस्थित बंद करा. यासाठी तुम्ही सिमेंट किंवा सिलिकॉन सीलंटचा वापर करू शकता.
तुमच्या बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये साप शिरलाच, तर अजिबात घाबरून जाऊ नका. सर्वात आधी दरवाजा बाहेरून बंद करा. त्यानंतर दरवाजाच्या खालून जी मोकळी जागा असते, तिथे एखादं कापड किंवा टॉवेल घट्ट कोंबा. जेणेकरून साप बाहेर येणार नाही. यानंतर लगेच सर्पमित्राला बोलावून घ्या. सापाला स्वतः मारण्याचा किंवा पळवून लावण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. हे तुमच्या जीवावर बेतू शकतं.