
Relationship Tips: नातं तुटलंय, बोलणं बंद आहे, कदाचित नंबरही ब्लॉक लिस्टमध्ये असेल. पण इन्स्टाग्रामच्या स्टोरी व्ह्यूअर लिस्टमध्ये एक नाव रोज सर्वात वर असतं. ते म्हणजे तुमच्या एक्सचं. फोटोला लाईक करत नसला तरी, तो गुपचूप सगळं पाहतोय. हे फक्त तुमच्यासोबतच नाही, तर ८०% लोकांसोबत घडतं.
तुम्हाला वाटतंय का, की तो अजूनही तुमच्यावर प्रेम करतो? त्याला परत यायचंय? मानसशास्त्रज्ञ सांगतात, प्रत्येक वेळी कारण प्रेम किंवा पश्चात्ताप असेलच असं नाही. यामागे वेगळंच मानसशास्त्र दडलेलं असतं.
१. उत्सुकता आणि 'माझ्याशिवाय ती/तो कसा आहे' हे पाहणे: हे सर्वात सामान्य कारण आहे. ब्रेकअपनंतर माणसाला जाणून घ्यायचं असतं की, माझ्याशिवाय समोरचा व्यक्ती जास्त खुश आहे की दुःखी? हे प्रेमापोटी नाही, तर आपला निर्णय योग्य होता की नाही, हे तपासण्यासाठी असतं. याला 'Curiosity Gap' म्हणतात.
२. इगो बुस्ट (Ego Boost): ब्रेकअपनंतर तुम्ही चांगले फोटो टाकले, फिरायला गेलात, यशस्वी झालात, तर एक्सला वाटतं, 'ही/हा अजूनही माझा विचार करत नाही का?' आणि जर तुम्ही दुःखी पोस्ट टाकली, तर त्याला वाटतं, 'मी अजूनही तिच्या/त्याच्या लक्षात आहे.' दोन्ही बाबतीत त्याचा इगो सुखावतो.
३. पूर्णपणे मुव्ह ऑन न होणे: अनेकदा लोक ब्रेकअप स्वीकारतात, पण मनातून ते मान्य करू शकत नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर लक्ष ठेवणं ही एक सवय बनून जाते. रोज सकाळी उठून जसं आपण वर्तमानपत्र वाचतो, तसंच तुमचं प्रोफाईल पाहिलं जातं. हे प्रेम असू शकतं, पण परत येण्याची हिंमत नसते.
४. नव्या नात्याशी तुलना: तुमचा एक्स जर नवीन रिलेशनशिपमध्ये गेला असेल, तरीही तो तुमच्यावर लक्ष ठेवतो. आपल्या सध्याच्या पार्टनरची तुमच्याशी तुलना करण्यासाठी तो असं करतो. तुम्ही काय करताय, त्याचा नवीन जोडीदार तुमच्यापेक्षा चांगला आहे का, ही तुलना त्याच्या मनात सतत सुरू असते.
५. परत येण्याचा रस्ता खुला ठेवणे (Orbiting): मानसशास्त्रामध्ये याला 'Orbiting' असं नाव आहे. नातं संपलंय, पण तो पूर्णपणे गायब होणार नाही. स्टोरी पाहून, कधीतरी रिअॅक्ट करून तो दाखवून देईल की, 'मी आहे'. जेणेकरून भविष्यात परत यायचं असेल तर रस्ता बंद होऊ नये. हे सर्वात धोकादायक असतं.
मानसशास्त्रज्ञ सांगतात, जर तुम्हाला खरोखरच मुव्ह ऑन करायचं असेल, तर हा लपाछपीचा खेळ थांबवा.
एक्स स्टोरी पाहतोय म्हणून वारंवार स्टोरी टाकून त्याला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुम्हीच जास्त अडकत जाल. जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल, तर त्याला म्यूट (Mute) किंवा रेस्ट्रिक्ट (Restrict) करा. ब्लॉक करणं अनेकदा खूपच नाटकीय वाटतं, पण म्यूट केल्यावर त्याला काही समजणारही नाही.
आणि सर्वात महत्त्वाचं, त्याचे स्टोरी व्ह्यूज पाहून असा विचार करू नका की त्याला परत यायचंय. जर त्याला खरोखरच परत यायचं असतं, तर त्याने स्टोरी पाहिली नसती, थेट मेसेज केला असता.
त्यामुळे स्टोरी व्ह्यूअर लिस्टमध्ये त्याचं नाव पाहून मन उदास करण्यापेक्षा, स्वतःच्या आयुष्यावर फोकस करा.