
मुंबई : आपण रडतो तेव्हा डोळ्यांतून अश्रू येणं साहजिक आहे. पण डोळ्यांतून पाणी आलं की आपोआप नाकातूनही पाणी गळायला लागतं. विशेषतः लहान मुलं रडतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसोबत नाकातूनही पाणी येतं. मोठे लोकही रडताना अनेकदा नाक पुसताना दिसतात. मुळात डोळे आणि नाकाचा नेमका संबंध काय आहे? रडताना नाकातून पाणी का येतं, यामागचं विज्ञान आपण समजून घेऊया.
आपल्या डोळ्यांतून नाकाकडे अश्रू वाहून नेणाऱ्या यंत्रणेला 'लॅक्रिमल ड्रेनेज सिस्टीम' (Lacrimal Drainage System) म्हणतात. यात 'नॅसोलॅक्रिमल डक्ट' (Nasolacrimal duct) हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. डोळ्यांत तयार झालेले अतिरिक्त अश्रू नाकापर्यंत पोहोचवण्याचं काम ही नळी करते.
फक्त रडतानाच नाही, तर सामान्य स्थितीतही आपल्या डोळ्यांत थोडे अश्रू सतत तयार होत असतात. हे अश्रू डोळ्यांना ओलावा देतात आणि धूळ, कचऱ्यापासून त्यांचं संरक्षण करतात. वापरलेले अश्रू डोळ्यांच्या कोपऱ्यातील छोट्या छिद्रांमधून ड्रेनेज सिस्टीममध्ये जातात आणि शेवटी नाकात पोहोचतात. म्हणूनच अनेकदा नाकातून पाणी येतं.
रडताना नाकातून पाणी का येतं?
आपण भावूक होतो किंवा खूप रडतो, तेव्हा नेहमीपेक्षा जास्त अश्रू तयार होतात. हे सगळे अश्रू ड्रेनेज सिस्टीममधून लगेच नाकात जाऊ शकत नाहीत. काही अश्रू गालावर ओघळतात, तर उरलेले नॅसोलॅक्रिमल डक्टमधून नाकात जातात.
म्हणूनच रडताना डोळ्यांतून पाणी येण्यासोबतच नाकातही पाणी साचल्यासारखं वाटतं. नाकात आलेले हे अश्रू तिथल्या नैसर्गिक द्रवांमध्ये मिसळतात आणि पातळ पाण्यासारखे नाकातून बाहेर येतात.
लहान मुलं सहसा मोठ्या आवाजात आणि खूप वेळ रडतात. अशा वेळी त्यांच्या डोळ्यांत खूप जास्त अश्रू तयार होतात. अश्रूंचा प्रवाह वाढला की नाकात जाणारं पाणीही वाढतं. म्हणूनच मुलं रडताना त्यांच्या डोळ्यांसोबत नाकातूनही पाणी गळताना स्पष्ट दिसतं. मोठ्या माणसांमध्येही हीच प्रक्रिया घडते. पण ते लगेच नाक पुसतात, त्यामुळे ते आपल्याला फारसं जाणवत नाही.
डोळ्यांत औषध टाकल्यावर तोंडात चव का लागते?
अनेकांना डोळ्यांत आय ड्रॉप्स टाकल्यावर थोड्या वेळाने नाकात किंवा घशात औषधाची चव आणि वास जाणवतो. यालाही डोळ्यांकडून नाकाकडे जाणारा अश्रूंचा मार्गच कारणीभूत असतो.
डोळ्यांत टाकलेल्या औषधाचा काही भाग अश्रूंसोबत नॅसोलॅक्रिमल डक्टमधून नाकात जातो. तिथून तो नाकाच्या मागच्या बाजूने घशाकडे जातो. त्यामुळे औषधाची चव तोंडात किंवा घशात जाणवते. म्हणजेच डोळ्यांत टाकलेलं औषध फक्त डोळ्यांत राहत नाही, तर ते नाक आणि तोंडातही पोहोचतं.
अश्रू म्हणजे फक्त दुःख किंवा आनंद झाल्यावर येणारं पाणी नाही. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते खूप गरजेचे असतात. डोळ्यांचा पृष्ठभाग ओलसर ठेवणं, त्याचं रक्षण करणं आणि धूळ बाहेर काढणं, यात अश्रू महत्त्वाची भूमिका बजावतात.
अश्रूंचे प्रामुख्याने बेसल टीयर्स (Basal tears), रिफ्लेक्स टीयर्स (Reflex tears) आणि इमोशनल टीयर्स (Emotional tears) असे प्रकार पडतात. डोळ्यांना ओलावा देणारे अश्रू सतत तयार होत असतात. धूर, धूळ किंवा कांदा कापताना डोळ्यांना त्रास होतो, तेव्हा रिफ्लेक्स म्हणून अश्रू येतात. तर भावना अनावर झाल्यावर येणाऱ्या अश्रूंना इमोशनल टीयर्स म्हणतात.
रडताना नाकातून पाणी आलं, म्हणजे सर्दी झालीये असा त्याचा अर्थ होत नाही. रडल्यामुळे वाढलेले अश्रू ड्रेनेज मार्गातून नाकात आल्यानेही नाक गळू शकतं. पण न रडताही सतत नाक गळत असेल, नाक बंद होत असेल किंवा डोळ्यांतून सतत पाणी येत असेल, तर त्याला ॲलर्जी, इन्फेक्शन किंवा अश्रूंच्या नळ्यांमधील इतर समस्या कारणीभूत असू शकतात. असा त्रास सतत होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं.