
मुंबई : दिवसभर ऑफिसमध्ये काम करून तुम्ही थकून घरी येता. जोडीदाराला मनातली एखादी खास गोष्ट सांगायला लागता. सुरुवातीला ते लक्ष देऊन ऐकतात, मानही हलवतात. पण थोड्याच वेळात त्यांचं सगळं लक्ष हातातल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर जातं. कधी नोटिफिकेशन चेक करणं, कधी मेसेजला रिप्लाय देणं, तर कधी बोलता बोलता इन्स्टाग्रामवर रील्स स्क्रोल करणं. हे चित्र आता जवळपास प्रत्येक घरातलं रोजचं झालं आहे.
कदाचित यावरून तुमचं मोठं भांडण होत नसेल, पण मनात एक प्रश्न नक्कीच येतो - 'तू माझं बोलणं ऐकतोयस तरी का?' नात्यातल्या या नव्या आणि सायलेंट प्रॉब्लेमला मानसोपचारतज्ज्ञांनी 'अटेन्शन इन्फिडेलिटी' (Attention Infidelity) म्हणजेच लक्ष न देण्याचा विश्वासघात असं नाव दिलं आहे. पूर्वी याला 'फबिंग' (Phubbing - Phone + Snubbing) म्हटलं जायचं. पण आता याचा परिणाम इतका गंभीर झालाय की याची तुलना थेट विश्वासघाताशी केली जात आहे.
हा प्रकार इतका भयंकर का आहे?
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही जोडीदारासमोर असूनही फोनवर जास्त लक्ष देता, तेव्हा त्यांच्या सबकॉन्शस माइंडमध्ये एक मेसेज जातो. त्यांना वाटतं की तुमच्यासाठी त्यांच्यापेक्षा फोनचं जग जास्त महत्त्वाचं आहे. यामुळे नात्यात हळूहळू दुरावा निर्माण होतो. जोडीदाराला स्वतःची किंमत कमी वाटू लागते, ते एकटे पडतात आणि दुर्लक्षित झाल्यासारखं फील करतात. रोज असंच चालत राहिलं तर छोट्या छोट्या नाराजीचं रुपांतर मोठ्या मानसिक दुराव्यात होतं. अनेकदा यामुळे नातं तुटण्याची वेळही येते.
हा प्रकार फक्त नवरा-बायको किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या नात्यातच नाही, तर आई-वडील आणि मुलं, तसंच मैत्रीतही असाच परिणाम करतो. जेव्हा मुलं पाहतात की आई-वडील त्यांचं ऐकण्यापेक्षा फोनमध्ये जास्त बिझी आहेत, तेव्हा त्यांच्यातही असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
नातं टिकवायचं असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे, घरात 'नो फोन झोन' तयार करा. जेवणाच्या टेबलावर, बेडरूममध्ये किंवा दोघं गप्पा मारत असताना फोन लांब ठेवा. दुसरी गोष्ट, बोलताना एकमेकांच्या डोळ्यात पाहून बोला (आय कॉन्टॅक्ट ठेवा) आणि फोन उलटा ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन दिसणार नाहीत. तिसरी गोष्ट, जोडीदाराला जाणीव करून द्या की त्यांचं बोलणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. जर एखादा खूप महत्त्वाचा मेसेज किंवा कॉल करायचा असेल, तर जोडीदाराला तसं सांगा. "एक मिनिट दे, हे खूप महत्त्वाचं आहे, मी लगेच आलो," असं सांगून मगच फोन हातात घ्या.
नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आवडत्या माणसापेक्षा कोणतंच नोटिफिकेशन जास्त महत्त्वाचं असू शकत नाही. आजपासूनच फोनला थोडा कमी आणि जोडीदाराला थोडा जास्त वेळ द्यायला सुरुवात करा.