
भारतासारखी खाद्यपदार्थांची रेलचेल जगाच्या पाठीवर कुठे नसेल. ‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे आणि ती सार्थ करणारे मिठाईचे नानाविध प्रकार भारतात पाहायला मिळतात. प्रत्येक राज्याची नव्हे तर, जिल्ह्याजिल्ह्यांमधील गोड पदार्थ तेथील परंपरा दर्शविणारे असतात. नुसत्या करंजीचेच इतके प्रकार आहेत की, बघून चकितच व्हायला होते. याच भारतीय गोड पदार्थांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली नाही तर, नवलच म्हणावे लागेल.
मिठाई कोणाला आवडत नाही? केवळ भारतातच नाही, तर परदेशातही भारतीय मिठाई आवडणारे अनेक लोक आहेत. आता भारताच्या दोन मिठाईंनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकप्रिय खाद्य आणि प्रवास मार्गदर्शक टेस्टॲटलासने जगातील 100 सर्वोत्तम मिठाईंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या दोन मिठाईंना स्थान मिळाले आहे.
उन्हाळा सुरू होताच कुल्फीची मागणी वाढतेच, पण त्याचबरोबर हिवाळ्यातही थंडी वाजत असताना लोक कुल्फीचा आस्वाद घेताना दिसतात. टेस्ट ॲटलासच्या यादीत या कुल्फीला स्थान मिळाले आहे. 100 मिठाईंमध्ये कुल्फीला 49वे स्थान मिळाले आहे. हे एक पारंपरिक आईस्क्रीम आहे, जे हळूहळू उकळलेल्या दुधापासून बनवले जाते. जास्त वेळ उकळल्यामुळे दुधाचे प्रमाण कमी होते, पण त्याचा सुगंध लक्ष वेधून घेतो. या आईस्क्रीमचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा शंकूच्या आकाराचा आकार. ती पारंपरिक, विशेष साच्यात आणि घट्ट झाकण वापरून तयार केली जाते, असे टेस्ट ॲटलासने कुल्फीबद्दल वर्णन केले आहे.
टेस्ट ॲटलासच्या सर्वोत्तम 100 मिठाईंच्या यादीत फिरनीला 60वे स्थान मिळाले आहे. फिरनी हा वाटलेल्या तांदळाच्या आणि दुधापासून बनवलेला एक गोड पदार्थ आहे. हे बदाम, केशर आणि वेलची घालून तयार केले जाते. हे विविध फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे. फिरनी उत्तर भारतातील लोकप्रिय मिठाईंपैकी एक आहे. दिवाळी आणि करवा चौथसारख्या सणांमध्ये ती बनवली जाते. पारंपरिकपणे, ती शिकोरा नावाच्या लहान मातीच्या भांड्यात दिली जाते. फिरनी थंड झाल्यावर खाल्ली पाहिजे.
मिठाईसाठी कोणते ठिकाण सर्वोत्तम?
टेस्ट ॲटलासने या मिठाईंना केवळ सर्वोत्तम मिठाईंच्या यादीत समाविष्ट केले नाही, तर त्या कोणत्या प्रदेशात खाल्ल्यास अधिक चवदार लागतील, याचीही माहिती दिली आहे. टेस्ट ॲटलासच्या मते, कुल्फी मुंबईतील पेशावरी, बंगळूरमधील बार्बेक्यू नेशन आणि हैदराबादमधील गोकुळ चाट येथे खाण्याचा सल्ला दिला आहे. तर, अमृतसरमधील केसर दा ढाबा आणि नवी दिल्लीतील बुखारा आणि करीम येथे सर्वोत्तम फिरनी मिळते.
तुर्कीमधील अंताक्या कुनेफेसी जगातील सर्वोत्तम मिठाईंच्या यादीत अव्वल स्थानी आहे. ही पारंपरिक कुनाफा प्राचीन तुर्की शहर अंताक्या येथून आली आहे. टेस्ट ॲटलासने यापूर्वी जगातील ५० सर्वोत्तम नाश्त्याच्या पर्यायांमध्ये भारताच्या तीन पदार्थांना स्थान दिले होते. महाराष्ट्राची मिसळ पाव 18व्या, पराठा 23व्या आणि दिल्लीचे छोले भटुरे 32व्या स्थानी होते.