
सर्व ऋतुंमध्ये सर्वात आल्हाददायक म्हणजे हिवाळा. हवेत छान गारवा पसरलेला असतो. अतिशय आल्हाददायक वातावरण असते. अनेक ठिकाणी तर, दुपारपर्यंत धुक्याची दुलई पसरलेली असते. असे असले तरी, यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. कफ प्रकृती असलेल्यांना या वातावरणाचा जास्त त्रास होते. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता उन्हाचेही तेवढेच महत्त्व आहे. विशेषत:, लहान मुलांना कोवळ्या उन्हाची गरज असते. या कोवळ्या उन्हाने नेमके काय लाभ मुलांना होतात. यासाठी उत्तम कोणती वेळ आहे, हे जाणून घेऊया!
डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यांत कडाक्याची थंडी असते. अशावेळी लोक काही तास उन्हात नक्कीच बसतात. उन्हात बसल्याने केवळ व्हिटॅमिन डी मिळत नाही, तर शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. हिवाळ्याच्या दिवसात ऊन मुलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कोवळ्या उन्हात बसल्याने शरीराला फायदाच होतो.
मुलांना दिवसभर उन्हात घेऊन बसणे अजिबात योग्य नाही. जर तुम्ही त्यांना 15 ते 30 मिनिटे ऊन दिले, तर त्यांच्या शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळेल. मुलांचे चेहरे, हात आणि पाय उघडे ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सूर्यकिरणे चांगल्या प्रकारे शोषली जातील. थंडीपासून बचावासाठी मुलांना गरम कपडे नक्की घाला. लक्षात ठेवा की मुलांना उन्हात बसवताना जास्त कपडे घालण्याची चूक करू नका, अन्यथा उन्हाचा परिणाम कमी होईल.
मुलांना कडक उन्हात घेऊन बसू नका. तुम्ही त्यांना सकाळी 8 ते 11 या वेळेत उन्हात बसवू शकता, कारण यावेळी सूर्यप्रकाश सौम्य असतो आणि त्याचा दुष्परिणाम मुलांच्या त्वचेवर होत नाही. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंतचे ऊन हानिकारक असते. यामुळे मुलांच्या त्वचेवर टॅनिंग किंवा जळजळ होऊ शकते. जर तुमचे मुल उन्हासाठी संवेदनशील असेल, तर त्याला अगदी कोवळ्या उन्हातच बसवा.
मुलांना उन्हात बसवल्याने केवळ हाडे मजबूत होत नाहीत, तर त्यांचा मूडही सुधारतो. थोडा वेळ उन्हात बसल्याने मुलांना चांगली झोप लागते आणि सर्दी-खोकलाही होत नाही. काही वेळ उन्हात बसल्याने मुलांना खूप आराम वाटतो. त्यामुळे हिवाळ्यात मुलांना ऊन नक्की द्या, पण योग्य पद्धतीचा वापर करा जेणेकरून त्यांच्या शरीराला फायदा होईल, नुकसान नाही.