
Somvati Amavasya Remedies : हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते, तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यंदा १५ जून २०२६ रोजी सोमवती अमावस्येचा योग जुळून येत आहे. असं मानलं जातं की, अमावस्येच्या रात्री काही खास ठिकाणी दिवा लावल्यास घरातली नकारात्मकता (Negative Energy) दूर होते आणि रखडलेली कामं मार्गी लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही. असं केल्यास अशुभ गोष्टी घडू शकतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल पुढे सविस्तर…
सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा आवर्जून करावी. रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावावा. हा उपाय केल्याने पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका मिळू शकते, असं मानलं जातं. हा उपाय केल्यानंतर मागे वळून पाहू नका, नाहीतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.
अमावस्येला भगवान भैरवनाथाची पूजासुद्धा नक्की करावी. भैरव देवाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, असं म्हणतात. भगवान कालभैरवाची पूजा करण्यासाठी एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या मंदिराची निवड करा. इथे दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहू नका.
नदी किंवा तलावाचा काठ हे पितरांचं स्थान मानलं जातं. अमावस्येच्या रात्री इथेही एक दिवा लावला पाहिजे. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. या ठिकाणी दिवा लावण्यासाठी शांत, निर्जन जागेची निवड करा आणि दिवा लावून मागे वळून पाहू नका.
घराच्या छतावर जास्त अंधार असतो. त्यामुळे या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात जमा होते, असं मानलं जातं. म्हणून अमावस्येच्या रात्री इथेही एक दिवा लावा. यामुळे संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ शकते. घरातील ही जागा नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त झाली, तर तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
(Disclaimer : या लेखात दिलेली माहिती धार्मिक ग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषांकडून घेतली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीकडे केवळ एक सूचना म्हणून पाहावं.)