
मुंबई : अनेक वर्षांपासून हृदयविकार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहतं. एखादा मध्यमवयीन माणूस, त्याच्या छातीत होणाऱ्या असह्य वेदना, धाप लागणं, घाम फुटणं आणि डाव्या हातात जाणवणाऱ्या कळा. हे चित्र आजही खरं असलं, तरी ती पूर्ण वस्तुस्थिती नाही.
हृदयविकार अगदी गुपचूप शरीरात वाढू शकतो. काही लोकांमध्ये नेहमीपेक्षा जास्त थकवा येणं, रोजची कामं करताना धाप लागणं, अपचनासारखा त्रास होणं किंवा व्यायाम करण्याची क्षमता हळूहळू कमी होणं, ही याची पहिली लक्षणे असू शकतात. काहींना तर थेट मोठा झटका येईपर्यंत कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसतच नाहीत.
तुम्ही तरुण आहात, सडपातळ आहात किंवा रोज व्यायाम करता, याचा अर्थ तुमचं हृदय १०० टक्के निरोगी आहे, असं अजिबात नाही.
उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, धूम्रपान, कुटुंबातील आजारांचा इतिहास आणि पोटाचा घेर वाढलेला असणं, या गोष्टी वरवर फिट दिसणाऱ्या व्यक्तीचाही धोका वाढवू शकतात. भारतीयांमध्ये अगदी तरुण वयातच हे धोके निर्माण होण्याची प्रवृत्ती जास्त असते. त्यामुळे केवळ बाह्यरूपावरून हृदयाच्या आरोग्याचा अंदाज बांधू नका.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, दीर्घकाळ मधुमेह असल्यामुळे मज्जातंतूंना (नसांना) इजा पोहोचते आणि त्यामुळे वेदना जाणवण्याची क्षमता कमी होऊ शकते.
परिणामी, हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा गंभीर आजार असूनही रुग्णाला छातीत दुखत नाही. त्याऐवजी अशा रुग्णांना धाप लागणे, प्रचंड थकवा येणे, घाम फुटणे किंवा व्यायाम करताना अचानक दमछाक होणे, असा त्रास जाणवू शकतो.
म्हणूनच, मधुमेहाच्या रुग्णांनी छातीत दुखण्याची वाट न पाहता हृदयाच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे.
हार्ट अटॅक येताना महिलांच्या छातीत दुखू शकतं, पण त्यासोबतच त्यांना प्रचंड थकवा, श्वास घेण्यास त्रास, मळमळ, चक्कर येणे, पाठ किंवा जबड्यात दुखणे किंवा अचानक खूप अस्वस्थ वाटणे, अशी लक्षणेही दिसू शकतात.
अनेकदा या लक्षणांकडे ॲसिडिटी, थकवा, ताणतणाव किंवा हार्मोनल बदल म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पण जर खरोखरच हृदयाचा आजार बळावत असेल, तर हे दुर्लक्ष जीवावर बेतू शकतं.
त्यामुळे सतत जाणवणारी आणि न समजणारी लक्षणे कधीही हलक्यात घेऊ नका.
व्यायाम करण्याच्या क्षमतेत होणारा बदल, हे सर्वात जास्त दुर्लक्षित केलं जाणारं लक्षण आहे.
जी व्यक्ती आधी सहज तीन मजले चढून जायची, तिला आता एका मजल्यावरच थांबावं लागत असेल. किंवा रोजच्या नेहमीच्या चालण्यानेही एखाद्याला खूप धाप लागत असेल आणि थकवा येत असेल.
यात छातीत भयंकर दुखत नसलं, तरी शरीराच्या क्षमतेत होणारा हा सततचा बदल नक्कीच गांभीर्याने घेण्यासारखा आहे.
विशेषतः भारतात, छातीत थोडं जरी अस्वस्थ वाटलं तरी त्याला गॅस किंवा ॲसिडिटी समजलं जातं.
हृदयाशी संबंधित त्रासात नेहमीच तीव्र वेदना होतात असं नाही. अनेकदा छातीत दडपण आल्यासारखं वाटतं, जडपणा जाणवतो, जळजळ होते किंवा अपचनासारखं वाटतं. केवळ लक्षणांवरून ती ॲसिडिटी आहे की हृदयाची वेदना, हे ओळखणं नेहमीच शक्य नसतं.
त्यामुळे छातीत नव्याने, तीव्र किंवा न समजणारी अस्वस्थता जाणवत असेल, तर घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं.
तुमचं कोलेस्ट्रॉल, वजन आणि लाइफस्टाईल उत्तम असली, तरी कुटुंबात जर कोणाला कमी वयात हृदयविकार झाला असेल, तर तुमचा धोका वाढतो.
ज्यांच्या आई-वडिलांना किंवा भावंडांना तरुण वयात हृदयविकार झाला आहे, त्यांनी याबद्दल डॉक्टरांशी नक्की चर्चा करावी. यामुळे तुमच्या हृदयाच्या धोक्याचं योग्य मूल्यमापन करता येतं आणि काही अतिरिक्त चाचण्यांची गरज आहे का, हे ठरवता येतं.
हृदयाची काळजी घेणं म्हणजे फक्त छातीत दुखण्याची वाट पाहणं नव्हे. रक्तदाब, ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल, पोटाचा घेर, धूम्रपान, शारीरिक हालचाल, झोप आणि कुटुंबातील आजारांचा इतिहास या सर्व गोष्टींचा यात समावेश होतो. जेव्हा हे अनेक धोके एकत्र येतात, तेव्हा नियमित तपासणी करणं अत्यंत गरजेचं बनतं.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला काही नवीन, न समजणारी किंवा नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे जाणवत असतील, तर ती 'हार्ट अटॅक'सारखी वाटत नाहीत म्हणून त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
हृदयविकार नेहमीच अचानक आणि मोठ्या स्वरूपात येत नाही. अनेकदा तो अगदी शांतपणे पूर्वसूचना देतो. जसे की, स्टॅमिना कमी होणे, विनाकारण धाप लागणे किंवा सतत थकवा जाणवणे. ही न दिसणारी लक्षणे वेळेवर ओळखली, तर एखाद्या मोठ्या धोक्यापूर्वीच योग्य उपचार मिळवता येतात.
- हा लेख एरेटे हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट-इंटरवेंशन कार्डिओलॉजी, डॉ. एन. धनंजनेय रेड्डी यांनी लिहिला आहे.