
मुंबई : भारतीय जेवण जगभरात आवडीने खाल्लं जातं. या जेवणात भरपूर विविधता आहे आणि कुणीही त्यांच्या आवडीनुसार यात बदल करू शकतं. शिवाय हे जेवण खिशाला परवडणारं आणि चवीला एकदम भन्नाट असतं. त्यामुळेच जगभरातल्या सर्वोत्तम पदार्थांच्या यादीत भारतीय जेवणाचं नाव नेहमीच पुढे असतं.
टेस्टऍटलसने (TasteAtlas) नुकतीच जगातील टॉप स्ट्यू (stews) पदार्थांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ब्राझील, फिलिपाइन्स, तुर्की अशा देशांमधले १० भारी पदार्थ आहेत. विशेष म्हणजे, या यादीत भारतीय जेवणाने एकदा नव्हे, तर चक्क दोनदा बाजी मारली आहे. मुर्ग मखनी (बटर चिकन) चौथ्या नंबरवर, तर शाही पनीर सहाव्या नंबरवर आहे.
मुर्ग मखनी, ज्याला आपण बटर चिकन म्हणून ओळखतो, तो उत्तर भारतातील सर्वात फेमस पदार्थांपैकी एक आहे. दिल्लीत तयार झालेल्या या डिशमध्ये चिकनचे मऊ तुकडे वापरले जातात. हे तुकडे आधी दही आणि मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून तंदूरमध्ये भाजले जातात.
त्यानंतर हे चिकन लोणी, क्रीम आणि सुगंधी मसाल्यांनी बनवलेल्या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये शिजवलं जातं. मुर्ग मखनीची चव थोडी गोड, आंबट आणि एकदम मलाईदार असते. बटर नान, रुमाली रोटी किंवा जिरा राईससोबत हे खाताना एकदम भारी लागतं.
शाही पनीर हा उत्तर भारताचा एक मस्त पदार्थ आहे. 'शाही' म्हणजे राजासारखा, आणि नावाप्रमाणेच याची चवही शाही असते. या शाकाहारी डिशमध्ये पनीरचे मऊ तुकडे टोमॅटो, कांदा, काजू, क्रीम आणि खड्या मसाल्यांच्या दाट ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात. यात वेलची आणि केशराचा हलका स्वाद असतो, ज्यामुळे याला एक छान गोडवा आणि रिच टेस्ट मिळते. सणासुदीला किंवा खास कार्यक्रमात शाही पनीर आवडीने बनवलं जातं आणि ते नान, पराठा किंवा पुलावसोबत सर्व्ह करतात.
सेको दे काब्रितो हा उत्तर पेरूमधील मटणाचा (बोकडाचा) एक पारंपरिक स्ट्यू आहे. यात मटण संथ आचेवर शिजवलं जातं आणि त्याची ग्रेव्ही एकदम चविष्ट असते. कोथिंबीर, लसूण, कांदा, मिरची आणि मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून हे बनवलं जातं. चव वाढवण्यासाठी आणि मटण मऊ होण्यासाठी यात बिअर किंवा चिचा दे जोरा (मक्याचं पारंपरिक पेय) घातलं जातं. या स्ट्यूची ग्रेव्ही हिरवीगार असते आणि ते सहसा भात, बीन्स आणि कसावासोबत खातात.
फॅनांग किंवा पनांग करी ही थायलंडची एक फेमस करी आहे. ही करी तिच्या दाट, मलाईदार आणि किंचित गोड, सुगंधी चवीसाठी ओळखली जाते. मध्य थायलंडमध्ये बनवली जाणारी ही करी वाळलेली लाल मिरची, गालंगल (galangal), लेमनग्रास, लसूण, कांदा आणि मसाल्यांच्या पेस्टपासून बनवतात. भाजलेल्या शेंगदाण्यांमुळे याला एक छान नटी (nutty) चव येते, तर नारळाच्या दुधामुळे ती एकदम मऊ लागते. ही करी गोमांस, चिकन किंवा डुकराच्या मटणासोबत बनवतात आणि त्यावर कफिर लाईमची पानं टाकून गरम जॅस्मिन राईससोबत खातात.
ह्युंकारबेगेंदी हा तुर्कीच्या ऑटोमन राजघराण्यातील एक पारंपरिक पदार्थ आहे. या नावाचा अर्थ 'सुलतानाला आवडलेला पदार्थ' असा होतो. यात कोकरू किंवा गोमांसाचे मऊ तुकडे टोमॅटोच्या दाट ग्रेव्हीत शिजवले जातात आणि वांग्याच्या स्मूदीसारख्या प्युरीसोबत सर्व्ह केले जातात. ही प्युरी भाजलेली वांगी, बटर, दूध आणि मैदा एकत्र करून बनवतात आणि त्यात चीझही टाकतात. वांग्याचा मलाईदार बेस आणि मटणाचा स्ट्यू यामुळे हा पदार्थ एकदम भारी लागतो.
करे-करे हा फिलिपाइन्समधला एक फेमस स्ट्यू आहे. हा सहसा बैलाच्या शेपटीच्या मटणापासून (oxtail) बनवतात, पण काही वेळा इतर मटणही वापरतात. शेंगदाण्यापासून बनवलेली दाट आणि मलाईदार ग्रेव्ही हे या डिशचं मुख्य वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे याला छान सोनेरी-तपकिरी रंग येतो. मटण मऊ होईपर्यंत संथ शिजवलं जातं आणि केळीचं फूल, वांगी आणि फरसबी यांसारख्या भाज्यांसोबत सर्व्ह केलं जातं. ग्रेव्ही दाट करण्यासाठी तुम्ही त्यात भाजलेल्या तांदळाची पावडर टाकू शकता. करे-करे सहसा बागुंग (bagoong) म्हणजे कोळंबीच्या आंबवलेल्या पेस्टसोबत खातात, ज्यामुळे याला एक मस्त खारट चव मिळते.