
मुंबई : मुंबईत नुकत्याच पडलेल्या इन्कम टॅक्सच्या (आयकर विभाग) धाडीत अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचं नाव जोडलं जात होतं. यावर सोमवारी तिने स्पष्टीकरण दिलं. इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट लिहित तिने या धाडीशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रकुलने लिहिलंय, "आजकाल काही स्वयंघोषित ऑनलाइन रिपोर्टर्स आणि मेनस्ट्रीम मीडियाचे पत्रकार सत्य न तपासताच बातम्या रंगवून सांगत आहेत, हे पाहून खूप वाईट वाटतं. त्यामुळे मी एकदाच काय ते स्पष्ट करते. या धाडीचा आणि माझा काहीही संबंध नाही."
इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पाहा: रकुल सिंगने शेअर केलेली पोस्ट (@rakulpreet)
वयाच्या २० व्या वर्षापासून आपण प्रामाणिकपणे टॅक्स भरत असल्याचं रकुलने आवर्जून सांगितलं. ती म्हणाली, "मी लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेय आणि या इंडस्ट्रीत माझा कोणीही गॉडफादर नाही. मी केवळ माझ्या मेहनतीच्या जोरावर इथवर पोहोचलेय. एक जबाबदार नागरिक म्हणून मी वयाच्या २० व्या वर्षापासून माझा टॅक्स भरत आहे. मी वैयक्तिक पातळीवर किंवा कोणत्याही प्रोडक्शन हाऊसच्या वतीने कोणत्याही बेकायदेशीर परदेशी व्यवहारात (foreign remittance) सामील नाही."
ती पुढे म्हणाली, "मी देशात किंवा परदेशात कोणाच्याही नावावर कोणतीही बेनामी संपत्ती ठेवलेली नाही. मला आजवर कोणीही कोणतीही संपत्ती गिफ्ट म्हणून दिलेली नाही आणि तत्त्व म्हणून मी अशा महागड्या भेटवस्तू कधीच स्वीकारत नाही."
कोणतीही 'खोटी' बातमी छापण्यापूर्वी सत्य पडताळून पाहण्याचं आवाहन रकुलने केलं आहे.
"ज्यांनी या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या छापल्या आहेत, त्यांनी त्या मागे घ्याव्यात आणि सत्य समोर आणावं, अशी माझी विनंती आहे. मीडियाचा व्यवसाय चालवताना प्रत्येकावर व्यावसायिक दबाव असतो, हे मला समजतं. पण त्यासाठी तुम्ही सत्याचा बळी देऊ शकत नाही. आणि नक्कीच कोणाच्या तरी प्रतिष्ठेची आणि रोजीरोटीची किंमत मोजून तर अजिबात नाही," असं तिने शेवटी स्पष्ट केलं.