
Weight Loss Tips: आजच्या धावपळीच्या जीवनात साखर आपल्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग बनली आहे. चहा, कॉफी, मिठाई, थंड पेयं, बिस्किटं, केक, पॅकेज्ड स्नॅक्स आणि प्रोसेस्ड फूड या सर्व गोष्टींमधून नकळत मोठ्या प्रमाणावर साखर शरीरात जाते. त्यामुळेच अनेक तज्ज्ञ साखरेला ‘पांढरं विष’ असे संबोधतात. साखर पूर्णपणे बंद करणं प्रत्येकासाठी शक्य नसले तरी तिचं प्रमाण कमी करणं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. विशेषतः वजन कमी करायचं असेल, मेटाबॉलिझम सुधारायचा असेल किंवा डायबिटीससारख्या आजारांपासून दूर राहायचं असेल, तर साखरेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात.
साखर शरीराला झटपट ऊर्जा देते, मात्र तिचं जास्त प्रमाण शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. आधुनिक जीवनशैलीत लोक गोड पेयं, मिठाई, बेकरी पदार्थ आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड मोठ्या प्रमाणावर खातात. या पदार्थांमध्ये असलेली अतिरिक्त साखर शरीरात अनावश्यक कॅलरीज वाढवते. विशेष म्हणजे, साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर पोट भरल्याची भावना फार काळ टिकत नाही. त्यामुळे वारंवार भूक लागते आणि जास्त खाण्याची सवय लागते. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. डॉक्टरांच्या मते, जास्त साखर खाल्ल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी बिघडते आणि टाइप 2 डायबिटीसचा धोका वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, द्रव स्वरूपातील साखर म्हणजेच सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेटबंद ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स आणि जास्त साखर असलेली कॉफी किंवा चहा हे अधिक घातक असतात. कारण पेयांमधून मिळणाऱ्या कॅलरीजमुळे पोट भरल्याची जाणीव होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या थंड पेयामध्ये किंवा पॅकेज्ड ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर असते. मात्र ते पिल्यानंतर पुन्हा लवकर भूक लागते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात आणि वजन झपाट्याने वाढू लागते. याशिवाय अशा पेयांमुळे लिव्हरवर ताण येतो आणि शरीरात चरबी जमा होण्याचा धोका वाढतो.
डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने फक्त एका महिन्यासाठी साखरेचं प्रमाण कमी केलं, तर शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात. सुरुवातीला गोड खाण्याची इच्छा होऊ शकते, थोडी चिडचिड किंवा थकवा जाणवू शकतो. मात्र काही दिवसांनंतर शरीर या बदलाला स्वीकारू लागतं.
1) वजन कमी होण्यास मदत
साखर कमी केल्यावर शरीरात जाणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज कमी होतात. त्यामुळे चरबी जमा होण्याचं प्रमाण घटतं. विशेषतः पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, एका महिन्यात साधारणपणे अडीच ते तीन किलो वजन कमी होऊ शकतं.
2) त्वचेवर सकारात्मक परिणाम
जास्त साखर खाल्ल्यामुळे त्वचेवर पिंपल्स, सूज आणि अकाली वृद्धत्वाची समस्या वाढू शकते. साखर कमी केल्यावर त्वचेतील सूज कमी होते आणि चेहरा अधिक स्वच्छ व तजेलदार दिसू लागतो. काही लोकांना त्वचेचा पोत सुधारल्याचाही अनुभव येतो.
3) पोट फुगण्याची समस्या कमी होते
अनेकांना सतत पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा अपचनाचा त्रास होतो. साखरयुक्त प्रोसेस्ड फूड कमी केल्यावर पचनक्रिया सुधारते आणि पोट हलकं वाटू लागतं. त्यामुळे शरीरात ऊर्जा वाढल्याची जाणीवही होते.
4) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते
साखर कमी खाल्ल्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे इन्सुलिनचं कार्य सुधारण्यास मदत होते. डायबिटीसचा धोका कमी करण्यासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
5) मानसिक आरोग्यावरही होतो परिणाम
साखर केवळ शरीरावरच नाही, तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. जास्त साखर खाल्ल्यानंतर काही वेळासाठी ऊर्जा वाढल्यासारखं वाटतं, पण नंतर थकवा आणि मूड स्विंग्स जाणवू शकतात. साखर कमी केल्यावर अनेकांना मानसिक स्थिरता, चांगली झोप आणि एकाग्रतेत सुधारणा जाणवते. सतत गोड खाण्याची सवय कमी झाल्यावर शरीर अधिक नैसर्गिक ऊर्जा निर्माण करू लागतं.
तज्ज्ञ सांगतात की, साखर पूर्णपणे बंद करणं प्रत्येकासाठी गरजेचं नाही. मात्र तिचं प्रमाण नियंत्रित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः पॅकेटबंद आणि प्रोसेस्ड फूडमधील ‘हिडन शुगर’ टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्याऐवजी फळं, ड्रायफ्रूट्स, नैसर्गिक गोड पदार्थ आणि संतुलित आहार यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळू शकते. तसेच नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
साखर कमी करणं सुरुवातीला कठीण वाटू शकतं, पण त्याचे दीर्घकालीन फायदे मोठे असतात. वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते त्वचा, हृदय आणि मानसिक आरोग्य सुधारण्यापर्यंत अनेक सकारात्मक बदल यामुळे दिसू शकतात. त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी करून आरोग्यदायी जीवनशैलीकडे छोटं पण महत्त्वाचं पाऊल टाकणं गरजेचं आहे.