
Parenting Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांसमोर मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे हे मोठे आव्हान बनले आहे. अनेकदा मुलांकडून अपेक्षित वर्तन होत नाही तेव्हा पालक ओरडण्याचा मार्ग निवडतात. मात्र, सतत ओरडल्याने मुलांमध्ये भीती, हट्ट किंवा दुरावा निर्माण होतो. मुलांना जबाबदाऱ्या शिकवायच्या असतील, तर प्रेम, संयम आणि समजूतदार पद्धती अधिक प्रभावी ठरतात. ओरडण्याऐवजी योग्य मार्ग वापरल्यास मुलं स्वतःहून जबाबदार बनू शकतात.
मुलं ऐकण्यापेक्षा पाहून जास्त शिकतात. पालकांनी स्वतः आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या, वेळेचे पालन केले, घरातील कामात सहभाग घेतला तर मुलंही तेच अनुकरण करतात. “तू असं कर” असं सांगण्यापेक्षा “मी असं करतो” हे दाखवणं अधिक परिणामकारक ठरतं. उदाहरणातून शिकवलेली जबाबदारी मुलांच्या मनावर खोलवर रुजते.
मुलांवर अचानक मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्यास ते गोंधळून जातात. त्याऐवजी त्यांच्या वयाप्रमाणे लहान कामे द्यावीत. उदा. खेळणी आवरणे, स्वतःची पिशवी तयार करणे, पाणी भरून ठेवणे. ही कामे पूर्ण केल्यावर त्यांचे कौतुक केल्यास मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि “मी करू शकतो” ही भावना निर्माण होते.
ओरडण्याऐवजी शांतपणे संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. एखादं काम का करायला हवं, ते केल्याने काय फायदा होतो, हे मुलांना समजेल अशा भाषेत सांगा. आदेश देण्याऐवजी त्यांचं मत विचारल्यास मुलं अधिक सकारात्मक प्रतिसाद देतात. संवादामुळे मुलांना जबाबदारी ही शिक्षा नसून शिकण्याची प्रक्रिया वाटते.
मुलं चूक करणारच, पण प्रत्येक चुकांसाठी ओरडल्यास ती जबाबदारीपासून पळ काढू लागतात. चूक झाल्यावर त्यांना त्याचे परिणाम समजावून सांगावेत आणि पुढच्या वेळी काय वेगळं करता येईल यावर चर्चा करावी. यामुळे मुलांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते आणि स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेण्याची सवय लागते.
मुलांनी जबाबदारीने वागल्यावर त्यांचे मनापासून कौतुक करा. प्रत्येक वेळी बक्षीस देणे आवश्यक नाही, पण “छान केलंस”, “मला तुझा अभिमान आहे” असे शब्द मुलांसाठी खूप महत्त्वाचे असतात. सकारात्मक प्रोत्साहनामुळे मुलं स्वतःहून जबाबदाऱ्या स्वीकारायला शिकतात आणि त्यांना ते ओझं वाटत नाही.