
New Gadget : गॅझेटप्रेमींसाठी नव्या वर्षांत एक वेगळी पर्वणीच आहे. Apple, Samsung, Motorola, Oppo आणि Vivo या ब्रँड्सचे नवे हँडसेट बाजारात येत आहेत. त्यातच आता नव्या गॅझेटबरोबरच फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी ओप्पो कंपनी एक आगळीवेगळी भेट घेऊन येत आहे. चांगल्या क्षमतेच्या दोन कॅमेऱ्यांचा फोन ओप्पो घेऊन येत आहे. त्याची फीचर्स पाहून बाजारात त्याचे चांगले स्वागत होण्याची शक्यता आहे.
लाँच होण्यापूर्वीच Oppo Find X9 Ultra स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. ड्युअल 200-मेगापिक्सल कॅमेरा हे Oppo Find X9 Ultra मोबाईलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असल्याचे म्हटले जात आहे. मुख्य कॅमेऱ्याव्यतिरिक्त, पेरिस्कोप टेलीफोटो लेन्समध्येही 200MP कॅमेरा दिला जाईल, असे संकेत मिळत आहेत.
लीक झालेल्या माहितीनुसार, Oppo Find X9 Ultra हा फ्लॅगशिप स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह लाँच होईल. डिजिटल चॅट स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, Oppo Find X9 Ultra मध्ये 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 200MP चा टेलीफोटो कॅमेरा असेल. फोनमध्ये ड्युअल पेरिस्कोप लेन्स असण्याचीही चर्चा आहे. यातील दुसरा सेन्सर 10x झूमसह अल्ट्रा-टेलीफोटो असेल, असा दावा टिपस्टरने केला आहे. या तीन लेन्समुळे फोटोग्राफीप्रेमींना उच्च दर्जाची फोकल लेन्थ मिळू शकते. Oppo Find X9 Ultra फोटोग्राफीचा राजा असेल, असा दावाही टिपस्टर करत आहे. तसेच, यात 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स असण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा असेल, अशाही चर्चा आहेत.
Oppo Find X9 Ultra मध्ये 6.8-इंचाचा 2K LTPO OLED स्क्रीन असेल. हा एक फ्लॅगशिप फोन असल्याने, तो स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटसह येईल, अशी माहिती आहे. फोनमध्ये 7,000 mAh पेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी अपेक्षित आहे. 2026 च्या सुरुवातीला फोन सादर झाल्यावरच Oppo Find X9 Ultra बद्दल अधिक माहिती समोर येईल.