
Shardiya Navratri 2025 : शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ही देवी ज्ञान, संयम, तपस्या आणि साधनेचे प्रतीक मानली जाते. "ब्रह्म" म्हणजे तपस्या आणि "चारिणी" म्हणजे आचरण करणारी, अशा अर्थाने ब्रह्मचारिणी म्हणजे तपस्विनी. या देवीच्या पूजेमुळे साधकाला संयम, ज्ञानप्राप्ती आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते.
देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेसाठी स्वच्छ पांढरा वस्त्र, तांदूळ, फुले (विशेषतः कमळ व जाई), अगरबत्ती, पंचामृत, दही-दूध, साखर, मध, फळे, पांढरे चंदन, कलश, गंगाजल आणि नैवेद्य आवश्यक असतो. या दिवशी देवीला शुद्धतेचे आणि साधेपणाचे प्रतीक असलेले पांढरे फुल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे आणि पूजा स्थळ गंगाजलाने शुद्ध करावे. नवरात्रातील कलशाची पूजा करून देवीला आमंत्रित करावे. देवीसमोर आसन घालून ध्यान लावावे. "ॐ देवीं ब्रह्मचारिण्यै नमः" या मंत्राचा जप करून देवीला पांढरे फूल, अक्षता, नैवेद्य आणि पाणी अर्पण करावे. पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने देवीची पूजा करता येते. त्यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून देवीला प्रणाम करावा.
देवीला प्रसन्न करण्यासाठी खालील मंत्राचा जप करणे फलदायी ठरते:
"ॐ दधाना कर पद्माभ्यामक्ष माला कमण्डलु।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥"
हा मंत्र जपल्याने साधकाला आत्मशांती, तपशक्ती आणि आयुष्यात यश मिळते.
बीज मंत्र : "ॐ ब्रां ब्रीं ब्रौं ब्रह्मचारिण्यै नमः।"
हा मंत्र 108 वेळा जपल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते.
देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेमुळे आयुष्यात संयम, ज्ञान आणि धैर्य वाढते. विद्यार्थ्यांनी, साधकांनी आणि कठीण जीवन प्रवास करणाऱ्यांनी या पूजेला विशेष महत्त्व द्यावे. असे मानले जाते की देवीची आराधना करणाऱ्या व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात, आणि त्याच्या जीवनात शांती व समृद्धी येते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी पूजेमुळे साधकाला ज्ञानमार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते.