Navratri 2025 : चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री दोन्ही देवीच्या उपासनेसाठी महत्त्वाच्या असल्या तरी त्यांचा काळ, धार्मिक महत्त्व आणि साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे. चैत्र नवरात्री रामजन्माशी तर शारदीय नवरात्री दुर्गामातेच्या विजयाशी संबंधित आहे.
चैत्र नवरात्री हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते आणि रामनवमीला समाप्त होते. या नवरात्रीला "रामनवमी नवरात्री" असेही म्हटले जाते कारण या काळातच श्रीरामांचा जन्म झाला होता. चैत्र नवरात्री प्रामुख्याने वसंत ऋतूत येते आणि निसर्गात नवचैतन्य निर्माण झाल्याने या उत्सवाला वेगळे महत्त्व आहे. विशेषतः उत्तर भारतात ही नवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते.
25
शारदीय नवरात्री 2025
शारदीय नवरात्री ही आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होऊन विजयादशमीपर्यंत साजरी केली जाते. ही नवरात्री देवी दुर्गेच्या शक्तीची उपासना म्हणून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. देशभरात विशेषतः पूर्व भारतात (पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा) या नवरात्रीत दुर्गापूजा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या नवरात्रीचा समारोप दसऱ्याने होतो, जो सत्याचा असत्यावर विजय दर्शवतो. यंदा येत्या 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे.
35
धार्मिक महत्त्वातील फरक
चैत्र नवरात्रीमध्ये मुख्यत्वे राम जन्मोत्सवाचे धार्मिक महत्त्व जोडलेले आहे. या नवरात्रीत भक्त उपवास करून देवीची आराधना करतात तसेच रामनवमीचा उत्सव साजरा होतो. शारदीय नवरात्रीमध्ये मात्र दुर्गामातेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. या काळात दुर्गामाता आणि महिषासुराच्या युद्धाची कथा महत्त्वाने सांगितली जाते, ज्यातून "शक्तीचा विजय" अधोरेखित होतो.
चैत्र नवरात्री साधेपणाने, घरगुती स्वरूपात साजरी केली जाते. यात देवीची पूजा, जप, उपवास, रामायण पठण आणि रामनवमीचा उत्सव असतो. शारदीय नवरात्री मात्र मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक उत्सवात बदलली आहे. दुर्गापूजा पंडाल, गरबा-डांडिया, दशहरा यात्रा यामुळे या नवरात्रीला सामाजिक आणि सांस्कृतिक रंगही लाभला आहे.
55
ऋतू व वातावरणाशी संबंध
चैत्र नवरात्री वसंत ऋतूमध्ये तर शारदीय नवरात्री शरद ऋतूमध्ये येते. म्हणूनच निसर्गातील बदलांशी या दोन्ही नवरात्री जोडलेल्या आहेत. चैत्र नवरात्री नवनिर्मिती आणि चैतन्याचे प्रतीक मानली जाते, तर शारदीय नवरात्री शक्ती आणि विजयाचे प्रतीक म्हणून साजरी होते.