Maruti Suzuki Car Sales : कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीची सुसाट कामगिरी!

Jaywant Patil   | CMS
Published : Oct 03, 2026, 10:44 AM IST
Maruti Suzuki Car Sales : कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीची सुसाट कामगिरी!

सार

सप्टेंबर २०२६ मध्ये मारुती सुझुकीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत ३६.९१ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे.

मुंबई : देशातील कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीने आपला दबदबा कायम ठेवलाय. मध्यमवर्गीय भारतीयांची पहिली पसंती असलेल्या मारुतीने सप्टेंबर २०२६ मध्ये तब्बल १,८१,८३८ प्रवासी वाहने (Passenger Vehicles) विकली आहेत. गेल्या वर्षी, म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये हा आकडा १,३२,८२० इतका होता. याचाच अर्थ, कंपनीने यंदा ३६.९१ टक्क्यांची तगडी वाढ नोंदवली आहे. ऑगस्ट २०२६ च्या तुलनेतही (१,७६,९७१ वाहने) सप्टेंबरमध्ये विक्री २.७५ टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच ऑगस्टपेक्षा ४,८६७ जास्त गाड्या विकल्या गेल्या. सणासुदीच्या दिवसांची सुरुवात झाल्याने ही विक्री वाढल्याचं बोललं जातंय.

एकूण विक्री २.३६ लाखांच्या पार

प्रवासी वाहनांसोबतच हलकी व्यावसायिक वाहने (LCV), इतर कंपन्यांना केलेला पुरवठा आणि निर्यात या सगळ्यांचा विचार केला, तर सप्टेंबरमध्ये मारुती सुझुकीची एकूण विक्री २,३६,०१३ युनिट्सवर पोहोचली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये हीच विक्री १,८९,६६५ युनिट्स होती. या एकूण वाढीत सर्वात मोठा वाटा प्रवासी वाहनांचाच आहे.

युटिलिटी वाहनांच्या विक्रीत मोठी उडी

मारुतीच्या युटिलिटी वाहनांना सप्टेंबरमध्ये ग्राहकांनी डोक्यावर घेतलंय. सप्टेंबर २०२५ मध्ये ४८,६९५ युनिट्सची विक्री झाली होती, ती सप्टेंबर २०२६ मध्ये थेट ७८,९११ युनिट्सवर गेली. या सेगमेंटमध्ये कंपनीने तब्बल ६२.०५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. एका वर्षात ३०,२१६ जास्तीच्या गाड्या विकल्या गेल्या.

यामध्ये ब्रेझा (Brezza), अर्टिगा (Ertiga), ई-वितारा (e-Vitara), फ्रॉन्क्स (Fronx), ग्रँड वितारा (Grand Vitara), इन्व्हिक्टो (Invicto), जिम्नी (Jimny), व्हिक्टोरिस (Victoris) आणि एक्सएल६ (XL6) या मॉडेल्सचा समावेश आहे.

छोट्या कार्सचीही जोरदार विक्री

मिनी, कॉम्पॅक्ट आणि मिड-साईझ सेगमेंटमधील कार्सची विक्रीही चांगलीच वाढली आहे. या सेगमेंटमध्ये सप्टेंबर महिन्यात ९१,८८७ गाड्या विकल्या गेल्या. सप्टेंबर २०२५ मध्ये हा आकडा ७४,०९० होता. म्हणजेच इथेही २४.०२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

या कॅटेगरीत अल्टो (Alto), बलेनो (Baleno), सेलेरिओ (Celerio), सियाझ (Ciaz), डिझायर (Dzire), इग्निस (Ignis), एस-प्रेसो (S-Presso), स्विफ्ट (Swift) आणि वॅगनआर (Wagon R) या गाड्या येतात. मारुतीच्या ईको (Eeco) व्हॅनची विक्रीही १०.०१ टक्क्यांनी वाढून ११,०४० युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात १०,०३५ ईको व्हॅन विकल्या गेल्या होत्या.

निर्यातीतही वाढ

सप्टेंबरमध्ये मारुती सुझुकीच्या निर्यातीतही वाढ पाहायला मिळाली. सप्टेंबर २०२५ मधील ४२,२०४ युनिट्सवरून निर्यात आता ४४,२१९ युनिट्सवर गेली आहे. ही वाढ ४.७७ टक्के आहे. मारुतीच्या 'सुपर कॅरी' या हलक्या व्यावसायिक वाहनाची विक्री १८.०९ टक्क्यांनी वाढून ३,४१४ युनिट्सवर पोहोचली.

मात्र, इतर वाहन उत्पादक कंपन्यांना केल्या जाणाऱ्या पुरवठ्यात घट झाली आहे. सप्टेंबर २०२५ मधील ११,७५० युनिट्सवरून हा आकडा ६,५४२ युनिट्सवर आलाय. यात ४४.३२ टक्क्यांची घसरण झाली आहे.

तिसऱ्या तिमाहीत ६.९६ लाख गाड्यांची विक्री

जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिसऱ्या तिमाहीत मारुती सुझुकीची एकूण विक्री ६,९६,६५४ युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच काळात ५,५०,८७४ गाड्या विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या तिमाहीत कंपनीने २६.४६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ३८.११ टक्क्यांनी वाढून ५,५५,०१२ युनिट्स झाली.

हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री २३.४६ टक्क्यांनी वाढून १०,४४१ युनिट्सवर पोहोचली. दुसरीकडे, तिसऱ्या तिमाहीतील निर्यात २.१४ टक्क्यांनी घसरून १,०८,११९ युनिट्सवर आली आहे. सप्टेंबरमधील दमदार विक्री आणि तिसऱ्या तिमाहीतील वाढीमुळे भारतीय वाहन बाजारात मारुती सुझुकीचा दबदबा आणखी वाढला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

लेझच्या पाकिटात निम्मी हवा का असते? आत हवा नाही तर...
Horoscope 3rd October 2026 : प्रवासाचा बेत आखला जाऊ शकतो! पाहा तुमच्या राशीत काय दडलंय