
Magnesium Deficiency : मॅग्नेशियम हे शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे जे स्नायूंचे कार्य, हृदयाचा ठोका, नसांचे आरोग्य, ऊर्जा उत्पादन आणि हाडांची मजबुती कायम ठेवण्यासाठी आवश्यक असते. मात्र दैनंदिन आहारात मॅग्नेशियमयुक्त अन्न कमी प्रमाणात घेतल्यास किंवा जीवनशैली बिघडल्यास शरीरात त्याची कमतरता निर्माण होते. आजकाल जंकफूड, तणाव, अनियमित झोप आणि औषधांचे प्रमाण वाढल्याने ‘मॅग्नेशियम डिफिशियन्सी’चे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. या कमतरतेकडे दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
मॅग्नेशियम कमी झाल्यास सर्वात पहिले परिणाम स्नायूंवर दिसून येतात. पायात अचानक गोळे येणे, स्नायू आकुंचन होणे, अंग सुन्न पडणे, हातापायात मुंग्या येणे ही सर्व सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय सतत थकवा येणे, ऊर्जा कमी होणे, चिडचिड, मनोस्थिती अस्थिर राहणे, झोप न लागणे असे मानसिक लक्षणेही दिसतात. काही व्यक्तींमध्ये हार्टबीट वाढणे किंवा अनियमित ठोके जाणवू शकतात. तसेच वारंवार डोकेदुखी, मायग्रेन, पाचनाचे त्रास, भूक मंदावणे, बद्धकोष्ठता आणि मासिक पाळी अनियमित होणे ही शरीराबाहेर दिसणारी संकेत आहेत.
जास्त काळ मॅग्नेशियमचे प्रमाण कमी राहिल्यास शरीरातील कॅल्शियमचे संतुलनही बिघडते ज्यामुळे हाडे कमकुवत होऊन ‘ऑस्टिओपोरोसिस’चा धोका वाढू शकतो. मधुमेह, थायरॉइड किंवा बीपी असलेल्या लोकांमध्ये त्याचा परिणाम अधिक घातक ठरू शकतो. हृदयाचे आजार, अनियमित हृदयाची धडधड, झटके येणे, गंभीर पचनासंबंधी त्रास किंवा मानसिक आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम दिसू शकतो. यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
मॅग्नेशियमचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी आहार सर्वात महत्त्वाचा आहे. हिरव्या पालेभाज्या (पालक, मेथी), सुका मेवा (बदाम, अक्रोड), बिया (भोपळ्याच्या, सुर्यफुलाच्या, चिया), साबूत धान्ये, ओट्स, ब्राऊन राईस, केळी, अवोकाडो, राजमा, चणे, डार्क चॉकलेट आणि मासे यांसारख्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. दररोज दोन वेळा पालेभाज्या, स्नॅक्समध्ये नट्स आणि रात्रीच्या जेवणात भाजी किंवा दाण्यांचे सेवन केल्यास मॅग्नेशियमचा तुटवडा भरून निघण्यात मदत होते.
तणाव, कॅफिन, अल्कोहोल आणि जंकफूड हे मॅग्नेशियम कमी करण्याचे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे दररोज ७-८ तासांची झोप, नियमित व्यायाम, कमी कॅफिन आणि संतुलित आहार गरजेचा आहे. जास्त घाम येणारे व्यायाम, डिहायड्रेशन किंवा काही औषधे (उदा. डाययुरेटिक्स) यामुळेही शरीरातील मॅग्नेशियम कमी होतो. गंभीर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्यावेत, कारण स्वतःहून घेतलेले सप्लिमेंट्स काहीवेळा शरीरावर उलट परिणाम करू शकतात.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)