आपल्याकडे रस्त्यावर किंवा स्थानिक बाजारात ५०० रुपयांत मिळणाऱ्या एका साध्या बॅगची किंमत एका आंतरराष्ट्रीय ब्रँडने चक्क ८.३ लाख रुपये ठेवली आहे. या अवाढव्य किमतीमुळे सध्या इंटरनेटवर एकच खळबळ उडाली आहे.
जगभरातील प्रसिद्ध फॅशन ब्रँड्स भारतीय संस्कृती आणि कलाकुसरीचा वापर करून बक्कळ नफा कमवत आहेत. हे आता नवीन राहिले नाही. पण आता 'फेंडी' (Fendi) या प्रसिद्ध इटालियन लक्झरी ब्रँडने बाजारात आणलेली नवी हँडबॅग एका मोठ्या वादात सापडली आहे.
24
फेंडीची 'नवरात्री' बॅग
फेंडीने 'Baguette 26424: Multicolour Re-Edition bag with embroidery and mirrors' या नावाने ही बॅग लाँच केली आहे. रंगीबेरंगी धागे, ३९,५०० मणी आणि ४७५ छोटे आरशे वापरून ही बॅग पूर्णपणे हाताने बनवली आहे. एक बॅग तयार करण्यासाठी १३८ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, असा कंपनीचा दावा आहे.
यासाठी त्यांनी तब्बल १०,००० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ८.३ लाख रुपये किंमत ठेवली आहे. पण खरी गोम इथेच आहे. गुजरात आणि राजस्थानच्या रस्त्यांवर नवरात्रीत महिला ज्या पारंपरिक आरशांच्या वर्कवाल्या कापडी बॅगा वापरतात, अगदी तशीच ही बॅग दिसते.
34
उद्योगपतींनीही नोंदवला निषेध
आरपीजी एंटरप्रायजेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी एक्स (X) वर आपला संताप व्यक्त केला. "प्राडाच्या कोल्हापुरी चपलेच्या वादानंतर आता फेंडीची 'नवरात्री' बॅग आली आहे. गुजरातच्या रस्त्यांवर ५०० रुपयांत मिळणाऱ्या डिझाईनसाठी हे लोक ८.३ लाख रुपये उकळत आहेत. पण मूळ भारतीय कारागिरांना याचे कोणतेही श्रेय दिले जात नाही. हे आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आपल्या कलाकुसरीचे शोषण करणे कधी थांबवणार?" असा सवाल त्यांनी विचारला.
बायोकॉनच्या संस्थापिका किरण मुझुमदार-शॉ यांनीही यावर कडक शब्दात टीका केली. "हा थेट आपल्या संस्कृतीचा गैरवापर आहे. आपली पारंपरिक कला जपणारे कारागीर दुर्लक्षित राहतात आणि हे ब्रँड्स त्याच कलेला लक्झरी प्रॉडक्ट बनवून विकतात," असे त्या म्हणाल्या.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नेटकऱ्यांनी या ब्रँडवर जोरदार टीका सुरू केली. "फेंडीचा लोगो नसता तर या बॅगला कोणी ५०० रुपयेही दिले नसते," अशी खिल्ली लोक उडवत आहेत. चीनप्रमाणे भारतानेही अशा विदेशी ब्रँड्सवर कायदेशीर निर्बंध लादावेत आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
यात सर्वात मोठा विनोद म्हणजे, ही बॅग 'मेड इन इटली' असल्याचा दावा कंपनी करते. पण प्रत्यक्षात मुंबईतील 'चाणक्य' या प्रसिद्ध एम्ब्रॉयडरी वर्कशॉपमध्ये भारतीय कारागिरांनी ती हाताने शिवली आहे. प्राडा आणि फेंडीसारख्या युरोपियन कंपन्यांसाठी 'चाणक्य' अनेक वर्षांपासून हे काम करत आहे.