Visa-Free Travel : आता व्हिसाचं टेन्शन नाही! भारतीय पासपोर्टवर २७ देशांमध्ये थेट एन्ट्री, वाचा संपूर्ण लिस्ट

Published : Aug 11, 2026, 03:20 PM IST
Visa-Free Travel : आता व्हिसाचं टेन्शन नाही! भारतीय पासपोर्टवर २७ देशांमध्ये थेट एन्ट्री, वाचा संपूर्ण लिस्ट

सार

2026 मध्ये भारतीय पासपोर्टधारकांना 27 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येणार आहे. थायलंड, मलेशिया आणि मॉरिशससारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचा या यादीत समावेश आहे. मात्र, प्रवासाला निघण्यापूर्वी प्रत्येक देशाचे नियम तपासणं महत्त्वाचं आहे.

मुंबई : परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग तुमच्यासाठी एक मस्त बातमी आहे. 2026 मध्ये भारतीय नागरिक तब्बल 27 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकणार आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. या 27 देशांव्यतिरिक्त, 47 देशांमध्ये 'व्हिसा ऑन अरायव्हल'ची सोय आहे आणि 66 देशांसाठी ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध आहे.

थायलंड आणि मलेशियाचाही समावेश

भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली पर्यटन स्थळं म्हणजे थायलंड आणि मलेशिया. ही दोन्ही नावं यादीत आहेत. थायलंडमध्ये भारतीय पासपोर्टवर तुम्ही ३० दिवस व्हिसाशिवाय फिरू शकता. तर मलेशियाने डिसेंबर 2026 पर्यंत भारतीयांना ३० दिवसांच्या व्हिसा-फ्री प्रवासाची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या देशांची ट्रीप प्लॅन करणं आणखी सोपं झालं आहे.

मॉरिशसमध्ये तब्बल ९० दिवस

सध्या मालदीवऐवजी मॉरिशस हा भारतीयांसाठी एक नवीन आणि आकर्षक पर्याय बनला आहे. इथे तुम्ही व्हिसाशिवाय तब्बल ९० दिवस राहू शकता. भूतान आणि नेपाळमध्ये जाण्याचे नियम तर खूपच सोपे आहेत. पण भूतानला जाताना तुम्हाला प्रवेशासाठी परवानगी (Entry Permit) घ्यावी लागते.

हे आहेत ते २७ देश

ज्या देशांमध्ये भारतीय व्हिसाशिवाय जाऊ शकतात, त्या देशांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे -
भूतान, नेपाळ, मॉरिशस, थायलंड, कझाकस्तान, मलेशिया, सेशेल्स, कुक आयलंड्स, नियू, इराण, मकाऊ, फिजी, बार्बाडोस, डॉमिनिका, ग्रेनेडा, सेनेगल, हैती, एल साल्वाडोर, मायक्रोनेशिया, त्रिनिदाद अँड टोबॅगो, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स, गांबिया, जमैका, सेंट किट्स अँड नेव्हिस, मॉन्टसेराट, वानुआतू आणि अंगोला.

काही देशांमध्ये १८० दिवसांपर्यंत मुक्काम

प्रत्येक देशात व्हिसाशिवाय राहण्याची मुदत वेगवेगळी आहे. डॉमिनिकामध्ये भारतीय नागरिक तब्बल १८० दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात. मॉन्टसेराटमध्येही पर्यटन आणि व्यवसायासाठी १८० दिवसांपर्यंत व्हिसाची गरज नाही. बार्बाडोस, ग्रेनेडा, सेनेगल, हैती, एल साल्वाडोर, त्रिनिदाद अँड टोबॅगो, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडीन्स, गांबिया आणि सेंट किट्स अँड नेव्हिस या देशांमध्ये ९० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय राहता येतं.

१४ दिवसांपासून १२० दिवसांपर्यंतची मुदत

कझाकस्तानमध्ये १४ दिवसांसाठी, तर इराणमध्ये दर सहा महिन्यांतून एकदा १५ दिवसांसाठी व्हिसा-फ्री प्रवास करता येतो. मकाऊ, नियू आणि मायक्रोनेशियामध्ये ३० दिवसांपर्यंत व्हिसा लागत नाही. अंगोलामध्येही ३० दिवसांची सूट आहे. फिजीमध्ये १२० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो, पण तिथे पोहोचल्यावर 'व्हिजिटर परमिट' घ्यावं लागतं. वानुआतूमध्ये प्रवेशाच्या अटींनुसार ३० ते १२० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय राहता येतं.

प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा

व्हिसा लागत नसला तरी काही देशांचे स्वतःचे काही नियम असतात. जसं की, तुमच्या पासपोर्टची ठराविक वैधता (Validity) शिल्लक असणं, परत येण्याचं तिकीट, हॉटेल बुकिंगचा पुरावा आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे असल्याचा पुरावा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे, कोणत्याही देशाची तिकीटं बुक करण्यापूर्वी त्या देशाच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर जाऊन प्रवासाचे लेटेस्ट नियम नक्की तपासा. कारण नियमांमध्ये कधीही बदल होऊ शकतो.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Snake Plant : आरोग्य, शांतता आणि शुद्ध हवा... घरात हे एक रोप लावा, फायदेच फायदे!
चांदीचे दिवस गेले, आता पायात घाला हे ट्रेंडी मण्यांचे पैंजण!