जेवणाची चव वाढवण्यासाठी आलं-लसूण पेस्ट खूप महत्त्वाची असते. पण घरी बनवलेली पेस्ट लवकर खराब होते का? मग ही सोपी ट्रिक नक्की वापरून पाहा, तुमची पेस्ट महिने न महिने टिकेल.
चिकन, पनीरपासून ते बिर्याणीपर्यंत कोणत्याही पदार्थाची चव वाढवायची असेल, तर त्यात आलं-लसूण पेस्ट लागतेच. यामुळे जेवणाला फक्त चवच नाही, तर मस्त सुगंधही येतो. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात रोज ताजी पेस्ट वाटायला वेळ नसतो. त्यामुळे अनेकजण ती आधीच बनवून ठेवतात. पण योग्य पद्धतीने साठवली नाही, तर ती लवकर खराब होते आणि तिचा वासही जातो. काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुमची आलं-लसूण पेस्ट ६ महिने अगदी फ्रेश राहील. ते कसं, ते आता पाहूया.
23
कृती आणि साहित्य
साहित्य: २५० ग्रॅम आलं (साल काढून सुकवलेलं), २५० ग्रॅम लसूण (सोललेला), १ चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि २ ते ३ चमचे तेल.
कृती: आलं स्वच्छ धुवून त्याची साल काढा आणि एका सुक्या कपड्यावर वाळत ठेवा. त्यात पाण्याचा एक थेंबही राहता कामा नये. लसूण सोलून तोही पूर्णपणे कोरडा असल्याची खात्री करा. पेस्ट जास्त काळ टिकवायची असेल, तर पाण्याला अजिबात स्पर्श होऊ देऊ नका. आता आल्याचे छोटे तुकडे करा, जेणेकरून ते मिक्सरमध्ये सहज वाटले जातील. मिक्सरच्या भांड्यात आलं आणि लसूण टाका. वाटताना पाणी अजिबात घालू नका. त्याऐवजी १ चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि २-३ चमचे तेल घाला. मिक्सर सलग न चालवता, पल्स मोडवर थांबून थांबून फिरवा आणि मऊ पेस्ट तयार करा.
33
ही गोष्ट ठेवा लक्षात
पेस्टमध्ये मीठ घातल्याने ते प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं आणि बॅक्टेरिया वाढू देत नाही. हळदीमुळे पेस्टचा रंग बदलत नाही आणि ती फ्रेश राहते. तेल घातल्याने पेस्टला छान टेक्स्चर मिळतं आणि हवेचा संपर्क तुटतो. पाणी घातल्यास पेस्टला लवकर बुरशी लागते, त्यामुळे पाणी न घालता तेल वापरूनच पेस्ट बनवा. तयार झालेली पेस्ट काचेच्या बरणीत भरून ठेवा. रोजच्या वापरासाठी ती फ्रिजच्या नॉर्मल शेल्फमध्ये ठेवली तर ३ महिने आरामात टिकते.
जर तुम्ही ही पेस्ट आईस ट्रेमध्ये टाकून तिचे क्युब्स बनवले आणि झिपलॉक बॅगमध्ये फ्रीजरमध्ये ठेवले, तर ती ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ चांगली राहते. पेस्ट काढताना कधीही ओला चमचा वापरू नका. या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची घरची आलं-लसूण पेस्ट बाजारातल्या पेस्टपेक्षा जास्त सुरक्षित आणि सुगंधी राहील.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.