
Health Care : गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य तज्ज्ञ आपल्याला धुम्रपानाच्या धोक्यांबद्दल सांगत आहेत. पण आता तज्ज्ञ आपल्या एका दुसऱ्या सवयीकडे लक्ष वेधत आहेत, जी नकळतपणे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे - आणि ती सवय म्हणजे तासनतास एकाच जागी बसून राहणे. आजच्या काळात, लोक ऑफिसमध्ये डेस्कवर, मीटिंगमध्ये किंवा डिजिटल डिव्हाइस वापरताना दिवसाला जवळपास दहा तास बसून असतात. हे वरवर पाहता निरुपद्रवी वाटत असले तरी, प्रमुख वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जास्त वेळ बसण्याचा थेट संबंध हृदयरोग, टाइप 2 मधुमेह आणि अकाली मृत्यू यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांशी आहे. ही माहिती 'द कॉन्वर्सेशन' (The Conversation) या वेबसाईटवरील तज्ज्ञांनी दिली आहे.
आरोग्यासाठी नेहमीच जास्त व्यायाम करण्याचा आणि चांगलं खाण्याचा सल्ला दिला जातो. हे महत्त्वाचं आहेच, पण संशोधकांच्या मते हे पूर्ण सत्य नाही. एखादी व्यक्ती व्यायामाचे सर्व नियम पाळत असेल, पण दिवसभर बसून राहत असेल, तर तिलाही आरोग्याचा धोका असतोच.
शारीरिक निष्क्रियता (Physical inactivity) म्हणजे पुरेसा व्यायाम न करणे, तर बैठी जीवनशैली (Sedentary behaviour) म्हणजे बसणे किंवा झोपणे यांसारख्या कमी ऊर्जेच्या क्रियांमध्ये जास्त वेळ घालवणे. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्हींचा आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो.
जेव्हा शरीर जास्त वेळ स्थिर राहतं, तेव्हा अनेक जैविक बदल होतात. तज्ज्ञांच्या मते, स्नायूंची हालचाल कमी होते, ज्यामुळे शरीराला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे कठीण जाते.
कालांतराने, यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स (insulin resistance) होऊ शकतो, जो टाइप 2 मधुमेहाचं एक प्रमुख कारण आहे. चरबी पचण्याची क्रिया मंदावते आणि रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा मर्यादित होतो. या बदलांमुळे हळूहळू उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
जास्त वेळ बसल्याने आपल्या हाडांच्या आणि स्नायूंच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. हालचाल कमी झाल्यामुळे आणि चुकीच्या पोश्चरमुळे मान, खांदे आणि पाठीच्या कण्यावर ताण येतो. यामुळेच अनेक ऑफिस कर्मचाऱ्यांना अंगदुखी किंवा शरीर आखडल्यासारखं वाटतं.
याशिवाय, जास्त वेळ हालचाल न केल्याने ऊर्जेची पातळी कमी होते, एकाग्रता कमी होते आणि कामाच्या वेळी कमी उत्पादनक्षम वाटू शकतं.
सार्वजनिक आरोग्य संशोधकांच्या मते, शारीरिक निष्क्रियतेमुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. प्रौढ व्यक्ती आपला बहुतेक वेळ कामाच्या ठिकाणी घालवतात, त्यामुळे आपल्या दैनंदिन सवयींवर ऑफिसचा मोठा प्रभाव असतो.
तज्ज्ञांच्या मते, बसण्याची वेळ कमी करण्यासाठी खूप मोठे बदल करण्याची गरज नाही. प्रत्येक तासाला काही मिनिटे उभे राहणे किंवा चालणे यासारख्या छोट्या कृतींमुळेही आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते.
यूकेमध्ये झालेल्या संशोधनासह अनेक अभ्यांसानुसार स्टँडिंग डेस्क, वॉकिंग मीटिंग आणि नियमितपणे हालचाल करण्यासाठी ब्रेक घेणे यांसारख्या उपायांमुळे रोजच्या बसण्याच्या वेळेत लक्षणीय घट होऊ शकते. कर्मचाऱ्यांनीही यामुळे एकाग्रता वाढल्याचे, अधिक ऊर्जावान वाटत असल्याचे आणि शारीरिक त्रास कमी झाल्याचे सांगितले आहे.
नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे, पण तो जास्त वेळ बसण्याच्या परिणामांना पूर्णपणे नाहीसा करू शकत नाही. दिवसभरातील छोटे आणि सातत्यपूर्ण बदल तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.