सध्या अनेक जण भात आणि चपातीऐवजी ज्वारीची भाकरी खाण्याला पसंती देत आहेत. ज्वारीची भाकरी आरोग्यासाठी उत्तम असली, तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. रोज ज्वारीची भाकरी खाताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत?
आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने अनेक जण भरडधान्यांकडे वळत आहेत. विशेषतः ज्वारीच्या भाकरीचा रोजच्या आहारात समावेश केला जातोय. पण भाकरी हेल्दी आहे म्हणून ती कशीही खावी, असा याचा अर्थ होत नाही. भाकरी बनवण्याची पद्धत, तिचं प्रमाण आणि सोबत खाल्ले जाणारे पदार्थ याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. भाकरी खाताना कोणत्या चुका टाळायला हव्यात?
26
प्रमाणाकडे दुर्लक्ष करणे
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फायबरसारखे पोषक घटक असतात. पण शेवटी हे एक धान्यच आहे, त्यामुळे जेवढी जास्त खाऊ तेवढा फायदा, हा विचार चुकीचा आहे. दिवसभराचा आहार, शारीरिक हालचाल, वय आणि शरीराची गरज यानुसार भाकरीचं प्रमाण ठरवा. विशेषतः वजन किंवा ब्लड शुगर कंट्रोल करणाऱ्यांनी गरजेपेक्षा जास्त भाकरी खाऊ नये.
36
जास्त तेल, तूप किंवा लोण्याचा वापर
भाकरी मऊ आणि चविष्ट करण्यासाठी थोडं तेल किंवा तूप लावणं ठीक आहे. पण भाकरीला भरपूर तूप किंवा लोणी लावून खाणं योग्य नाही. यामुळे जेवणातील कॅलरीज खूप वाढतात. चवीसोबतच प्रमाणाचंही भान ठेवायला हवं. ज्वारीची भाकरी भाजी, डाळ आणि दह्यासारख्या संतुलित पदार्थांसोबत खाणं केव्हाही चांगलं.
ज्वारीची भाकरी खाताना भाज्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. काही जण फक्त भाकरी जास्त खातात आणि भाजी किंवा इतर पौष्टिक पदार्थ खूप कमी घेतात. एकाच प्रकारच्या अन्नावर अवलंबून न राहता, जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, डाळी आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश नक्की करा.
56
पीठ साठवण्याची चुकीची पद्धत
ज्वारीचं पीठ योग्य प्रकारे साठवलं नाही, तर त्याची क्वालिटी आणि चव बिघडू शकते. विशेषतः उष्ण आणि दमट जागी पीठ ठेवताना काळजी घ्या. गरजेपुरतंच पीठ दळून आणा आणि ते हवाबंद डब्यात ठेवा. पिठाचा वास, रंग किंवा चवीत काही बदल जाणवल्यास ते न वापरणंच हिताचं ठरेल.
66
भाकरी बनवण्याची पद्धत
ज्वारीच्या पिठात कोमट पाणी योग्य प्रमाणात मिसळल्यास भाकरी मऊ आणि सहज थापता येते. खूप कडक किंवा कोरडी भाकरी खाणं काहींना कठीण जाऊ शकतं. भाकरी व्यवस्थित भाजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तसंच, रोज ज्वारीची भाकरी खातोय म्हणून इतर धान्यं पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. रोज एकच पदार्थ खाण्यापेक्षा आहारात विविधता ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.