हिवाळ्यात केस गळतीची समस्या खूप वाढते. थंड हवेमुळे केस अगदी सुक्या गवतासारखे कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. पण काळजी करू नका, फक्त एका खास तेलाचा वापर करून तुम्ही या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकता.
आजकाल वयाचा कोणताही विचार न करता प्रत्येक जण केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहे. हिवाळा आला की ही केस गळती आणखीनच वाढते. केस नुसते गळतच नाहीत, तर ते सुक्या गवतासारखे कोरडे आणि निर्जीव होतात. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अनेक जण महागडी तेले आणि शाम्पू वापरतात. पण तरीही काहीच फायदा होत नसेल, तर बाजारात मिळणाऱ्या या महागड्या उत्पादनांना रामराम ठोका. त्याऐवजी शेवग्याच्या पानांचा वापर करा. शेवग्याच्या पानांचे तेल वापरून तुम्ही केस गळती थांबवू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? ते कसे, ते आता आपण पाहूया.
शेवग्याच्या पानांमधील पोषक घटक -
शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई सोबतच ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, लोह आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. हे घटक केसांना खोलवर ओलावा देतात आणि त्यांना सुंदर बनवतात.
23
घरीच शेवग्याच्या पानांचे तेल कसे बनवावे?
साहित्य -
ताजी शेवग्याची पाने – १ वाटी (किंवा शेवग्याच्या पानांची पावडर - २ चमचे)
शुद्ध खोबरेल तेल – १ वाटी
एरंडेल तेल (Castor Oil) – २ चमचे
कृती -
शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यात पाण्याचा एकही थेंब राहणार नाही अशा प्रकारे ती सुकवून त्याची मऊ पेस्ट वाटून घ्या. एका भांड्यात खोबरेल तेल, एरंडेल तेल आणि शेवग्याच्या पानांची पेस्ट एकत्र करा. हे मिश्रण मंद आचेवर डबल बॉयलर पद्धतीने किंवा थेट गॅसवर १०-१५ मिनिटे गरम करा. आता या तेलाचा रंग लालसर झाल्यानंतर गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि एका काचेच्या बाटलीत साठवून ठेवा.
33
हे तेल केसांना कसे लावावे?
कोमट तेलाने मसाज -
आठवड्यातून २ वेळा हे शेवग्याच्या पानांचे तेल थोडे कोमट करा. हे तेल केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत चांगले लावून घ्या. बोटांच्या शेंड्यांनी १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मुळांकडील रक्तप्रवाह वाढतो आणि केस मुळांपासून मजबूत होतात. तेल लावल्यानंतर ४५ मिनिटांनी किंवा रात्रभर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी सौम्य, रसायनमुक्त शाम्पूने केस धुवा.
हेअर मास्क -
२ चमचे शेवग्याचे तेल + २ चमचे ताजे दही + १ चमचा मध घ्या. या सर्वांचे एक चांगले मिश्रण तयार करा. त्यानंतर हे मिश्रण टाळूला आणि केसांना चांगले लावून ३० मिनिटे तसेच राहू द्या. हिवाळ्यात कोरड्या झालेल्या केसांसाठी हे नैसर्गिक कंडिशनरसारखे काम करते आणि केसांना रेशमासारखे मऊ बनवते.
हेअर सीरम -
केस धुतल्यानंतर जेव्हा केस थोडे ओलसर असतील, तेव्हा हातावर शेवग्याच्या तेलाचे २-३ थेंब घ्या आणि ते फक्त केसांच्या टोकांना लावा. यामुळे केसांची टोके दुभंगण्यापासून वाचतात आणि केसांना एक छान चमक मिळते.
घ्यायची काळजी -
हिवाळ्यात केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करू नका. फक्त कोमट पाणीच वापरा. गरम पाण्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस अधिकच कोरडे होतात. आठवड्यातून दोनदा या तेलाचा नियमित वापर केल्यास कोंडा तर कमी होतोच, शिवाय केस गळणे थांबून ते दाट वाढतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.