
ऋग्वेद, जो जगातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ मानला जातो, त्याची सुरुवातच अग्नीच्या स्तुतीने होते. "ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम्॥". अग्नीला यज्ञाचा पुरोहित, देवता आणि सर्वश्रेष्ठ रत्न प्रदान करणारा मानले गेले आहे. बृहदारण्यक उपनिषदात "तमसो मा ज्योतिर्गमय" ही प्रार्थना आढळते. तिचा अर्थ, "अंधारातून प्रकाशाकडे ने" हा जीवनदृष्टीचा मूलमंत्रच आहे.
अग्नी म्हणजे ज्ञान, तेज आणि उर्जेचे प्रतीक. अग्नीची ज्योत नेहमी वरच्या दिशेनेच जाते, हे एक गूढ विज्ञान सांगते की प्रत्येक प्रकाशस्वरूप उर्जेची दिशा सदैव उन्नत असते. अग्नी फक्त तापदायक किंवा नष्ट करणारा नाही, तर तो अंधाराचा नाश करणारा, जीवनाला दिशा देणारा दिव्य घटक आहे.
दीप पूजेची परंपरा आणि दीप अमावस्या
भारतामध्ये दीपावली सर्वांत प्रसिद्ध दिव्यांचा सण आहे. पण दीपपूजा केवळ दीपावलीपुरती मर्यादित नाही. भारतात विविध ऋतूंप्रमाणे विविध अमावस्या आणि पौर्णिमा साजऱ्या केल्या जातात, आणि त्यातही दीप अमावस्या ही एक अनोखी अमावस्या आहे, जी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरी केली जाते. ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणूनही काही भागांत ओळखली जाते, परंतु मूळ परंपरेत ती दीपपूजेच्या आणि श्रावणाच्या स्वागताच्या दृष्टीने अधिक पवित्र मानली जाते.
या दिवसाचे महत्त्व बहुआयामी आहे. सर्वप्रथम, हा दिवस घरातील सर्व दिव्यांची पूजा करण्यासाठी समर्पित असतो. वर्षभर आपल्याला प्रकाश देणाऱ्या आणि अंधार घालवणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते.
दिवा म्हणजे फक्त मातीचा किंवा धातूचा एक पात्र नव्हे, तो ज्ञान, मांगल्य, सकारात्मकता, पावित्र्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी घरातील सर्व समया, पणत्या, लामणदिवे, निरांजन या सर्वांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते.
दीप अमावस्या आणि श्रावण महिन्याचे आगमन
दीप अमावस्या साजरी केल्यानंतर लगेचच श्रावण महिन्याची सुरुवात होते. श्रावण हा अत्यंत पवित्र, व्रत, उपासना, पूजन व संयमाचा महिना मानला जातो. त्यामुळे त्याच्या स्वागतासाठी घराच्या साफसफाईपासून ते मानसिक तयारीपर्यंत विविध गोष्टी केल्या जातात. दिव्यांची स्वच्छता आणि पूजन यालाही त्यात महत्त्वाचे स्थान आहे.
अमावस्या ही तिथी आपल्या पितरांच्या स्मरणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी तर्पण, दानधर्म, पिंडदान आदी धार्मिक विधी केल्यास पितरांना समाधान मिळते, अशी श्रद्धा आहे. दिवे लावल्याने त्यांच्या मार्गाला प्रकाश मिळतो, अशी भावना यात अंतर्भूत आहे. त्यामुळे दीप अमावस्येचा हेतू केवळ सौंदर्य किंवा आंघोळ-खाण्यापुरता मर्यादित न राहता त्यात एक आध्यात्मिक स्तरदेखील जोडले गेले आहे.
दिव्यांची पूजा कशी केली जाते?
दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची नीट स्वच्छता केली जाते. समया, निरांजन, मातीच्या पणत्या, लामणदिवे हे सर्व एका पाटावर रचून त्यांची पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वापरून दिव्यांना सजवले जाते. त्यानंतर खालील मंत्र म्हटला जातो:
“दीप सूर्याग्निरूपस्त्वं, तेजसां तेज उत्तमम्।
गृहाण मत्कृतां पूजां, सर्वकामप्रदो भव॥”
(अर्थ: हे दीप, तू सूर्य आणि अग्नीचे रूप आहेस. तू सर्व तेजांमध्ये सर्वोत्तम आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.)
या दिवशी कणकेचे दिवे बनवण्याची एक खास परंपरा असते. गव्हाच्या पिठाचे दिवे बनवले जातात आणि त्यात तूप व वात घालून ते प्रज्वलित केले जातात. काही ठिकाणी दिव्यांना पुरणपोळी, गोड वड्या, गोड दिवे अशा नैवेद्याचेही महत्व असते.
दिव्यांचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा
प्राचीन काळात जेव्हा माणसाने अग्नीचा शोध लावला, तेव्हा तो त्याच्या जीवनातील सर्वात मोठा क्रांतिकारी क्षण होता. अग्नीच्या साहाय्याने त्याने अंधारावर मात केली, थंडीपासून स्वतःचे रक्षण केले आणि हिंस्र प्राण्यांपासून सुरक्षा मिळवली. म्हणूनच अग्नीबद्दल मनात भीती आणि आदराची भावना निर्माण झाली. हीच भावना पुढे जाऊन अग्नीपूजेमध्ये परिवर्तित झाली.
हळूहळू, अग्नीचे प्रतीक असलेले दिवे मानवी जीवनात प्रवेश करत गेले. सुरुवातीला मातीचे दिवे वापरले गेले, त्यानंतर धातूचा वापर सुरू झाला आणि समया, निरांजने यांसारखी दिव्यांची विविध रूपे तयार झाली. पितळ, तांबे, चांदी यांसारख्या धातूंमधून तयार झालेल्या दिव्यांनी पूजेचा भाग घेतला आणि आजपर्यंत हे स्वरूप जपले गेले आहे.
भारतीय संस्कृतीत अज्ञान हा अंधार समजला गेला आहे आणि ज्ञान हा प्रकाश. म्हणूनच आपण शाळांमध्ये, विद्यापीठांत, संमेलनांमध्ये "ज्ञानदीप प्रज्वलन" हा एक धार्मिक व शैक्षणिक विधी मानतो. दीप हा केवळ प्रकाश देतो इतकेच नव्हे, तो अंधकाराचा नाश करतो, दिशा दाखवतो आणि मनात श्रद्धा निर्माण करतो. दिवा जळत असतो, तेव्हा तो आपले संपूर्ण जीवन इतरांना प्रकाश देण्यासाठी अर्पण करतो. ही भावना माणसासाठीही आदर्श ठरते.