
CERT In Issues High Severity Warning for iPhone Users : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) ॲपलची विविध उत्पादने आणि डिव्हाइसेस वापरणाऱ्यांसाठी एक गंभीर सुरक्षा इशारा जारी केला आहे. आयफोन आणि आयपॅडसह सर्व डिव्हाइसेस त्वरित अपडेट करण्याचे निर्देश CERT-In ने दिले आहेत. ॲपल डिव्हाइसेसमध्ये हॅकर्सना सहजपणे प्रवेश मिळवून देणाऱ्या त्रुटी आढळल्याचे CERT-In ने म्हटले आहे. या त्रुटींमुळे अनियंत्रित कोड कार्यान्वित करणे, संवेदनशील माहिती मिळवणे, सुरक्षा नियंत्रणे बायपास करणे, डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DoS) हल्ले करणे आणि सेवांमध्ये व्यत्यय आणणे शक्य होऊ शकते, असेही CERT-In ने स्पष्ट केले आहे.
ॲपलची उत्पादने वापरणारे व्यक्ती आणि संस्था सायबर हल्ल्यांच्या निशाण्यावर असू शकतात, असा इशारा इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिला आहे. ज्या ॲपल डिव्हाइसेसमध्ये 26.1 पूर्वीचे आयफोन/आयपॅड व्हर्जन, 11.1 पूर्वीचे watchOS, 18.1 पूर्वीचे tvOS, 2.1 पूर्वीचे visionOS, 17.6.1 पूर्वीचे Safari, 15.4 पूर्वीचे Xcode, 15.1 पूर्वीचे macOS Sequoia, 13.7.1 पूर्वीचे Ventura आणि 12.7.2 पूर्वीचे Monterey व्हर्जन आहे, ती त्वरित अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आता आढळलेल्या सुरक्षा समस्या ॲपल डिव्हाइसेसमधील कर्नल, वेबकिट, कोअरॲनिमेशन आणि सिरी यांसारख्या सिस्टम घटकांवर परिणाम करतात. यामध्ये मोठा धोका असल्याने, सर्व आयफोन वापरकर्त्यांनी त्यांची डिव्हाइसेस ॲपलने जारी केलेल्या नवीनतम सॉफ्टवेअर आवृत्त्यांवर (iOS 26.1 आणि इतर) अपडेट करावीत, अशी शिफारस CERT-In ने केली आहे. या अपडेट्समध्ये रिपोर्ट केलेल्या त्रुटी दूर करणारे पॅचेस समाविष्ट आहेत. ॲपलच्या इतर सर्व ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्सच्या नवीन आवृत्त्यांमध्येही असेच सुरक्षा पॅच आहेत.
आयफोन ग्राहकांनी ऑटोमॅटिक अपडेट्स सुरू ठेवावेत, असा सल्ला इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) दिला आहे. केवळ विश्वसनीय स्रोतांवरूनच ॲप्स डाउनलोड करावेत. अनावश्यक लिंक्सवर क्लिक करू नये, असा सल्लाही CERT-In ने आयफोन ग्राहकांना दिला आहे.