
सकाळचे आठ वाजले होते. बाहेर हलकासा पाऊस पडत होता. थोडेसे धुके, थोडासा गारवा. मुंबईच्या डोंबिवलीतील एका एसटी बस स्थानकावर सुरू असलेली धावपळ. ऑफिसच्या, कॉलेजच्या किंवा इतर कारणांनी लोकांची वर्दळ चाललेली. त्या गर्दीत एक देखणी मुलगी, साधेपणाने पण आत्मविश्वासाने बसमध्ये चढली. तिच्या चेहऱ्यावर शांत सौंदर्य होतं आणि डोळ्यांत एक प्रकारचा उत्सुक भाव.
तिने बसमध्ये जागा शोधली. खिडकीजवळची जागा निवडली. बस हळूहळू भरत चालली. थोड्याच क्षणात एक मुलगा आत आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडं गोंधळलेपण, पण एका नजरेत हुशार, विचार करणारा चेहरा. त्याने नजरेने रिकामी जागा शोधली आणि योगायोगाने तिच्याजवळच येऊन बसला.
प्रथम दोघांमध्ये कमालिची शांतता होती. बस सुरू झाली. प्रवासाला सुरुवात झाली. अचानक तिचा पेन खाली पडला. त्याने पटकन वाकून तो उचलला आणि तिला दिला. ती हलकसं स्मित करत म्हणाली, “थॅंक यू.” त्याने मान डोलावली आणि म्हणाला, “वेलकम.”
त्या साध्या क्षणातून संवाद सुरू झाला. कॉलेज, अभ्यास, करिअर, आवडती गाणी, खाणं-पिणं, मुंबईचं जीवन. एकामागोमाग एक विषय निघत गेले. दोघांचं नातं अनोळखीपणाच्या सीमारेषा ओलांडून ओळखीच्या वळणावर आलं. त्यांच्या बोलण्यात गोडवा होता. नैसर्गिकपणा होता. कुठलाही बनावटपणा नव्हता. जणू काही दोघं एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते.
ती खूप प्रसन्न होती. तिचं हसणं संपूर्ण वातावरण आनंदी करत होतं. तो जरा शांत होता. पण तिच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटत होतं. दोघांच्यात खास केमिस्ट्री जुळून आली होती जी शब्दांपेक्षा भावना व्यक्त करत होती.
प्रवास जसजसा पुढे जात होता, तसतशी बसमध्ये गर्दी वाढत चालली होती. पण त्यांच्या छोट्याशा जागेत एक सुंदर जग निर्माण झालं होतं. त्यात ते दोघेच होते. एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंतचा तो तासाभराचा प्रवास. पण त्यात एक प्रेमकथा साकारत होती.
त्याच्या मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या. तिला मोबाईल नंबर विचारू का? पुढे भेट होईल का? पण मनातल्या मनात त्याला धाडस होत नव्हतं. कदाचित तो घाबरत होता, नकाराला किंवा तिच्या नाराजीला.
तिच्याही मनात काहीसं असंच होतं. तिलाही तो आवडत होता. त्याचं शांत हसणं. समजून घेण्याचा स्वभाव. बोलण्यातील रस . हे सगळं तिला मोहवत होतं. पण तिलाही वाटत होतं , "मी मोबाईल नंबर विचारणं योग्य का?" समाजाची चौकट, भीती आणि अनिश्चितता यामध्ये ती अडकली होती.
आणि त्या क्षणी बस तिच्या थांब्याजवळ पोहोचली.
तिने हलकेच उठून त्याच्याकडे पाहिलं. “छान वाटलं तुझ्याशी बोलून,” ती म्हणाली.
“मलाही,” तो म्हणाला, पण मनात एक खिन्नता होती.
ती बसमधून उतरली. थोडं पुढे गेल्यावर ती वळून पाहत राहिली. तिची नजर तो असलेल्या खिडकीत स्थिरावली होती. तोही तिला स्तब्ध पाहत होता. काही क्षण असे आले जे शब्दांनी सांगणं कठीण होतं. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. डोळ्यांत साठवलेली भावना, पण ओठांवर शब्दच नव्हते.
बस सुरू झाली. ती दूर जाऊ लागली. दोघेही दूर जात होते. पण मनानं एकमेकांशी जोडले गेले होते. त्या एका भेटीत प्रेम होतं. पण अबोल. बोलण्याची वेळ होती, पण हिम्मत नव्हती. त्यांचं प्रेम फक्त नजरेत उरलं. त्या प्रेमाला नाव नव्हतं, पण अस्तित्व होतं.
पुढचे काही दिवस दोघंही आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार झाले होते. ती बस, त्या गप्पा, ते हसणं, सगळं सतत डोळ्यांसमोर येत होतं. दोघंही मनात प्रार्थना करत होते की “कदाचित पुन्हा कधी भेट होईल.”
तो रोज तीच बस पकडत राहिला. ती जागा शोधत राहिला. पण ती कधीच परत आली नाही. तिला वेळ बदलावा लागला की बस? का कॉलेजचा टायमिंग बदललं? कुणास ठाऊक!
तीही तशीच होती. ती बस, ती खिडकी, सगळं पुन्हा पुन्हा आठवत राहिलं. मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात त्याचं हसणं अजूनही तसंच जपून ठेवलं होतं.
प्रेम कधी कधी मोठ्या घोषणा करत येत नाही, ते येतं शांतपणे… एक छोटीशी भेट, एक लाजरं हास्य, आणि एक न पाहिलेलं स्वप्न घेऊन. त्या दिवशी त्या दोघांचं प्रेम उदयाला आलं. पण त्याला व्यक्त होण्याची वेळ मिळाली नाही.
काही गोष्टी अधुऱ्या राहतात, पण त्यांच्यातच खरी जादू असते. त्या अधुऱ्या क्षणांची सुंदर आठवण ही पूर्ण प्रेमकथेपेक्षा अधिक हृदयस्पर्शी असते.
कोणतीही वचनं नाहीत, कोणतंही वादळ नाही. फक्त नजरेतले प्रश्न, मनातल्या भावना आणि एका तासाच्या प्रवासात जन्मलेलं, पण कधीच व्यक्त न झालेलं प्रेम.
आजही ते दोघं कदाचित कुठेतरी आहेत, आपापल्या जगात. कदाचित त्यांचं आयुष्य वेगळ्या दिशांनी गेलं असेल, पण त्या एका क्षणात त्यांनी जे अनुभवलं, ते आयुष्यभर पुरणारं आहे.