Real Paithani Saree : महिलांना पैठणी साडी नेसणे फार आवडते. खरंतर, अस्सल पैठणी फार महाग मिळते. पण यामागे काही खास कारणे देखील आहेत. यामुळे अस्सल पैठणी खरेदी करायची असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पैठणी ही महाराष्ट्राची पारंपरिक आणि अत्यंत प्रतिष्ठेची साडी आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला शहर हे पैठणी साडीचं माहेरघर मानलं जातं. सोन्यासारखा झळझळीत रंग, रेशमी पोत आणि मोहक डिझाईन्समुळे पैठणीचा आकर्षण केव्हाही वेगळंच असतं. मात्र आजच्या काळात बाजारात बनावटी पैठण्याही मोठ्या प्रमाणात मिळतात, त्यामुळे अस्सल पैठणीची ओळख पटवणं खूप गरजेचं आहे.
25
रेशीम धाग्यांची चमक
अस्सल पैठणी ही 100% शुद्ध रेशीमपासून बनवलेली असते. त्यामुळे तिच्या कापडाला एक वेगळीच चमक आणि गुळगुळीतपणा असतो. बनावट पैठणीला असा नैसर्गिक उजाळा नसतो, आणि ती थोडीशी राठ किंवा कृत्रिम वाटते. शिवाय अस्सल पैठणीच्या रंगात खोलपणा असतो. विशेषतः मोरपंखी, नारळी-पिठांबर, राणी, जांभळा अशा पारंपरिक रंगांमध्ये. ही रंगसंगती नैसर्गिक रंगांपासून तयार केली जाते, त्यामुळे ती उठून दिसते.
35
जरी आणि डिझाइनची बारकाई
पैठणीची खरी ओळख तिच्या पल्लूवरील आणि बॉर्डरवरील डिझाईनमधून होते. अस्सल पैठणीवर पारंपरिक डिझाइन्स जसे की मोर, कमळ, नारळी फुलं, हंस, आणि आंबा (पैठणीमध्ये याला कलश डिझाईन म्हणतात) अतिशय सूक्ष्म आणि हस्तमजुरीत विणलेली असतात. ही डिझाइन्स दोन्ही बाजूंनी सारखीच दिसतात. बनावटी पैठणीवर मशीनद्वारे डिझाइन केल्यामुळे त्या डिझाइनच्या मागील बाजूस थ्रेड कटिंग किंवा जोड दिसतात, तर अस्सल पैठणीवर असा फरक दिसत नाही.
अस्सल पैठणी हस्तमागावर विणली जाते, त्यामुळे तिचं काम खूप वेळखाऊ, पण सुबक असतं. प्रत्येक साडी तयार व्हायला अनेक दिवस लागतात. त्यामुळे साडीची घडी उकलली तर तिच्यात ठिपक्यांसारख्या (pixellated) डिझाईनसारखे दिसत नाही. तर ती एकसंध आणि सुसंगत वाटते. शिवाय, प्रत्येक अस्सल पैठणीवर लहानसा कापडी टॅग किंवा ठिगळ असतो, जो त्याच्या हस्तमाग ओळखीचं चिन्ह मानला जातो.
55
किंमत आणि खरेदीचं ठिकाण
अस्सल पैठणी ही महाग असते – यामध्ये शुद्ध रेशीम आणि सोन्याच्या जरीचा वापर होतो. त्यामुळे जर कोणी खूपच कमी किमतीत 'अस्सल' पैठणी देतोय, तर ती बनावट असण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच पैठणी खरेदी करताना सरकारी दुकानं (म्हणजेच सहकारी संस्था, ग्राहक भांडार) किंवा विश्वसनीय विक्रेत्यांकडूनच घ्यावी. येवला, औंढा, किंवा नाशिकमध्ये स्थानिक विणकरांकडून घेतल्यास शंभर टक्के खात्री असते.