
मुंबई : गणेश चतुर्थी आली की घरात उत्साहाचं वातावरण असतं. फुलांची सजावट, दिव्यांची रोषणाई आणि मुख्य म्हणजे रांगोळी... याशिवाय सण अपूर्णच वाटतो. घराच्या दारात किंवा जिथे बाप्पाची स्थापना केली आहे, तिथे एक सुंदर रांगोळी काढली की घराला एक वेगळीच शोभा येते. आणि यासाठी तुम्हाला कोणी एक्सपर्ट असण्याची गरज नाही. थोडी क्रिएटिव्हिटी आणि काही रंग वापरून तुम्हीही मस्त रांगोळी काढू शकता.
बाप्पाच्या सणासाठी बाप्पाचीच रांगोळी, यापेक्षा भारी काय असू शकतं? गणपतीचं एक साधं स्केच काढा आणि त्याच्या आजूबाजूला फुलं, पानं, ठिपके किंवा भौमितिक आकार काढून डिझाइन पूर्ण करा. ही डिझाइन सणासाठी अगदी परफेक्ट आहे.
फुलांच्या डिझाइनची रांगोळी गणेश चतुर्थीला खूपच छान दिसते. तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या पाकळ्या वापरून गोलाकार रांगोळी काढू शकता. किंवा रांगोळीच्या रंगांनीच सुंदर फुलं रेखाटू शकता. ही एक सदाबहार डिझाइन आहे.
ज्यांना रांगोळी काढण्याचा जास्त सराव नाही, ते सुद्धा मोराची रांगोळी सहज काढू शकतात. फक्त मोराचं एक बेसिक डिझाइन काढा आणि त्याचा पिसारा वक्र रेषा, ठिपके आणि लहान फुलांनी सजवा. ही दिसायला खूप आकर्षक वाटते.
कोणत्याही शुभ प्रसंगी कमळाची रांगोळी काढली जाते. देवघरासमोर, दाराजवळ किंवा गणपतीच्या मूर्तीजवळ तुम्ही एक मोठं कमळ आणि त्याच्या बाजूला पानं काढून सुंदर डिझाइन तयार करू शकता.
ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, त्यांच्यासाठी ही आयडिया बेस्ट आहे. समान अंतरावर ठिपके काढा आणि त्यांना रेषांनी जोडून एक छान डिझाइन तयार करा. नंतर त्यात रंग भरा आणि कडेने दिवे लावले की रांगोळी आणखी उठून दिसेल.
रांगोळी काढण्याआधी जागा स्वच्छ आणि कोरडी करून घ्या. जर तुम्ही रांगोळीची पावडर वापरत असाल, तर आधी बाहेरची बॉर्डर काढून घ्या आणि मग आत रंग भरा. यामुळे काम सोपं होतं. एकमेकांच्या विरुद्ध रंग (contrasting colours) वापरा, जेणेकरून डिझाइन उठून दिसेल.
रांगोळी पूर्ण झाल्यावर तिच्या बाजूला छोटे दिवे किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिव्यांची ज्योत रांगोळीच्या रंगांपासून किंवा सजावटीपासून दूर ठेवा.
तुम्ही गणपतीचं डिटेल डिझाइन काढा किंवा फुलांचं साधं डिझाइन, तुमची सजावट नक्कीच आकर्षक आणि सुंदर दिसेल.