एका दिव्यांग युवकाने बंजी जंप केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतातील सर्वात उंच बंजी जंपिंगच्या ठिकाणी हा पराक्रम करण्यात आला आहे.
साहसप्रेमींसाठी बंजी जंप हे एक आवडते साहस आहे. ज्यांचे हातपाय व्यवस्थित आहेत तेही हा पराक्रम करायला घाबरतात. खूप उंचावरून कंबरेला दोरी बांधून खाली ढकलण्याचा हा बंजी जंप पाहून अनेकांना भीती वाटते. अशा परिस्थितीत एका दिव्यांग व्यक्तीने हा पराक्रम केला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हिमालयन बंजी या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
दिव्यांग असूनही मनाची तयारी करून या युवकाने बंजी जंपचा पराक्रम करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. दिव्यांगांना बंजी जंप करण्यासाठी कोणीही प्रोत्साहन देत नाही, पण जर मनात असेल तर काहीही अशक्य नाही हे या युवकाने दाखवून दिले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, पर्यवेक्षक युवकाच्या व्हीलचेअरला सुरक्षा पट्टे बांधतात, त्यांना शुभेच्छा देतात आणि वरून खाली ढकलतात. हा थरारक व्हिडिओ क्षणभर प्रेक्षकांना थक्क करतो.
अशक्य ते शक्य करणारी भारतातील एकमेव बंजी जंपिंग कंपनी आमची आहे. व्हीलचेअर वापरणारा आणि पक्षाघाताचा त्रास असलेला हा युवक भारतातील सर्वात उंच बंजी जंप करणारा ठरला आहे. ११७ मीटर उंचीवरून उडी मारून त्याने आपले स्वप्न पूर्ण केले आहे, असे लिहिताना हिमालयन बंजीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आश्चर्य आणि कौतुकाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काहींनी व्हीलचेअरवरील व्यक्तीने हा पराक्रम केल्याबद्दल चिंता व्यक्त केली तर काहींनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. मला देवाने दोन पाय दिले तरी मी हा पराक्रम करू शकत नाही, अशी एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे. व्हीलचेअरनेही त्याला थांबवले नाही, तो खूप धाडसी आहे, असे दुसऱ्याने म्हटले आहे. तुम्ही हा पराक्रम केल्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे, असे आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे. एकंदरीत, ज्यांचे हातपाय व्यवस्थित आहेत तेही हा पराक्रम करायला घाबरतात, अशा वेळी पाय व्यवस्थित नसतानाही हा पराक्रम करणाऱ्या या युवकाच्या धाडसाला सलाम.