
West Bengal Election Results 2026: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालाच्या दिवशी एक मोठा प्रश्न सगळ्यांना पडलाय - एकूण २९४ जागा असताना मतमोजणी फक्त २९३ जागांवरच का होत आहे? या प्रश्नाचं उत्तर दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फलता मतदारसंघात दडलं आहे, जी या निवडणुकीतील सर्वात वादग्रस्त जागा ठरली आहे.
फलता विधानसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानावेळी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप समोर आले. मतदारांना धमकावणे, मतदान केंद्रांवर बाहेरच्या लोकांचा वावर आणि EVM मध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारींमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. भाजपचे उमेदवार देबांग्शु पांडा यांनी दावा केला की, एका बूथवर त्यांच्या पक्षाच्या बटणावर टेप लावून ते झाकण्यात आलं होतं. तर इतर अनेक बूथवरही अशाच प्रकारच्या घटनांचे व्हिडिओ समोर आले. या आरोपांनंतर परिस्थिती इतकी बिघडली की केंद्रीय सुरक्षा दलांना हस्तक्षेप करावा लागला. बेलसिंह परिसरात झालेल्या लाठीचार्जमुळे तणाव आणखी वाढला, ज्यात अनेक जण जखमी झाले. यात काही महिला आणि एका लहान मुलालाही दुखापत झाल्याची माहिती आहे.
या सर्व गंभीर घटनांची दखल घेत भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) फलता मतदारसंघातील सर्व २८५ बूथवर फेरमतदान घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हे फेरमतदान २१ मे रोजी होईल, तर मतमोजणी २४ मे रोजी केली जाईल. याशिवाय, पश्चिम मगराहाट आणि डायमंड हार्बरमधील १५ बूथवरही फेरमतदान घेण्यात आले आहे. यावेळी सुरक्षेची कडक व्यवस्था असेल, असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय दलांची तैनाती, मायक्रो-ऑब्झर्व्हर, वेबकास्टिंग आणि संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी बंधनकारक करण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यान झालेल्या घटनांनंतर एकूण ७७ बूथवर फेरमतदानाची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी ३२ बूथ एकट्या फलतामधील होते. या मुद्द्यावरून बंगालचं राजकारणही चांगलंच तापलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार (Sukanta Majumdar) यांनी याला "महिलांचा विजय" म्हटलं आहे, तर दुसरीकडे टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत थेट आव्हान दिलं आहे.
एकीकडे फलता जागेवरचा सस्पेन्स कायम असताना, दुसरीकडे उर्वरित २९३ जागांचे निकाल राज्यात तृणमूल काँग्रेसची सत्ता परत येणार की भाजप पहिल्यांदाच सरकार स्थापन करणार, हे ठरवतील. एक गोष्ट स्पष्ट आहे की, फलता ही केवळ एक जागा नसून या निवडणुकीचा सर्वात मोठा 'टर्निंग पॉइंट' ठरली आहे. आता सगळ्यांच्या नजरा २१ मे आणि २४ मे कडे लागल्या आहेत, जेव्हा या राजकीय रहस्यावरील पडदा उठेल.