
Weather Update : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र आहे. कुठे कडाक्याची थंडी नागरिकांना गारठवते आहे, तर कुठे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होत आहे. मॉन्सून संपून अनेक महिने उलटले असले तरी काही भागांत पावसाने अद्यापही निरोप घेतलेला नाही. विशेष म्हणजे, 1 जानेवारी 2026 रोजीही देशातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून थंडीचा जोर वाढलेला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात घसरले आहे. परभणी जिल्ह्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून येथे 6.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. धुळे येथे 6.6 अंश, निफाडमध्ये 6.8 अंश, तर यवतमाळ, अहिल्यानगर, गोंदिया आणि नागपूर येथे किमान 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. पुढील काही दिवस परभणी, धुळे आणि निफाडमध्ये कडाक्याची थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एका नवीन पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांत हवामानात मोठा बदल होणार आहे. यामुळे काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, तर उंच डोंगराळ भागांत हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी विशेषतः आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
31 डिसेंबरच्या रात्री पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट ते अतिदाट धुके पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये 1 जानेवारी 2026 पर्यंत धुक्याचे प्रमाण हळूहळू कमी होईल, असा अंदाज आहे. तसेच 31 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट आणि मुझफ्फराबाद येथे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1 जानेवारी 2026 रोजी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर 31 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय 31 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही शहरांमध्ये थंडी आणि पावसासोबतच प्रदूषणाची पातळीही वाढताना दिसत आहे.