
मुंबई : एशियन गेम्स २०२६ मध्ये विथ्या रामराजने रेकॉर्ड ब्रेक करत कांस्यपदक जिंकलं आहे. तिच्या या यशाचं दक्षिण रेल्वेचे मुख्य अॅथलेटिक्स कोच निजामुद्दीन यांनी जोरदार कौतुक केलं. आज (२९ सप्टेंबर) होणाऱ्या महिलांच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीतही ती सुवर्णपदक जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी या भारतीय अॅथलीटने महिलांच्या ४०० मीटर हर्डल्समध्ये पीटी उषा यांचा तब्बल ४२ वर्षांचा नॅशनल रेकॉर्ड मोडीत काढत इतिहास रचला. याआधी हांगझोऊमध्ये झालेल्या एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत विथ्याने या रेकॉर्डची बरोबरी केली होती.
नागोयाच्या मिझुहो स्टेडियमवर सोमवारी फायनल मॅच झाली. शर्यतीपूर्वी पाऊस आणि रिमझिम सरींमुळे ट्रॅक ओला झाला होता, त्यामुळे परिस्थिती खूपच आव्हानात्मक होती. पण तरीही विथ्याने सर्व १० हर्डल्स पार करत तिसरा क्रमांक पटकावला. यूएईच्या मरियम करीमने ५४.३१ सेकंद वेळ नोंदवत गेम्स रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकलं, तर कझाकस्तानच्या एडेलिना झेम्सने ५४.५८ सेकंदात रौप्यपदक मिळवलं. विथ्याने ५४.७५ सेकंदांची तिची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवत कांस्यपदक खिशात घातलं. यासोबतच तिने १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पीटी उषा यांनी सेट केलेला ५५.४२ सेकंदांचा नॅशनल रेकॉर्डही मोडला. तेव्हापासून अबाधित असलेला हा रेकॉर्ड अखेर विथ्याने मोडीत काढला.
कोच निजामुद्दीन यांनी एएनआयला सांगितलं की, "विथ्या रामराजने एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकलं आहे. तिने ५४.७५ सेकंद वेळ नोंदवत नवा नॅशनल रेकॉर्ड बनवला. भारताची 'गोल्डन गर्ल' पीटी उषा यांनी १९८४ मध्ये ५५.४२ सेकंदांचा जो रेकॉर्ड सेट केला होता, तो ४२ वर्षांचा रेकॉर्ड विथ्याने मोडला आहे."
मंगळवारी होणाऱ्या महिलांच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीतही विथ्या आणि भारतीय टीम सुवर्णपदक जिंकेल, असा विश्वास कोचने व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, “उद्या (मंगळवारी) तिची ४x४०० महिलांची रिले शर्यत आहे. मला आशा आहे की टीमला सुवर्णपदक मिळेल. तिने आतापर्यंत एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकलंय, फक्त सुवर्णपदकाची कमी आहे. ती नक्कीच सुवर्णपदक जिंकेल अशी मला खात्री आहे.” आता विथ्याचं संपूर्ण लक्ष महिलांच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीवर असेल. एशियन गेम्समध्ये आपल्या पदकांच्या संख्येत आणखी एक भर घालण्याची मोठी संधी तिच्याकडे आहे.