Viral Resignation: 'माझ्यात स्पेशल पॉवर नाही, 24 तास ड्युटी अशक्य'; पोलिसाचा व्हॉट्सॲपवरच राजीनामा

vivek panmand   | CMS
Published : Sep 10, 2026, 06:20 PM IST
Viral Resignation: 'माझ्यात स्पेशल पॉवर नाही, 24 तास ड्युटी अशक्य'; पोलिसाचा व्हॉट्सॲपवरच राजीनामा

सार

वाराणसीतील एका पोलीस कॉन्स्टेबलने सततच्या ड्युटीच्या ताणामुळे व्हॉट्सॲप ग्रुपवरच राजीनामा दिला. 'माझ्यात कोणतीही विशेष शक्ती नाही,' असं म्हणत त्याने ड्युटी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोपही केला आहे.

लखनऊ (दि. 10 सप्टेंबर): "माझ्याकडे कोणतीही विशेष शक्ती नाही. त्यामुळे मी रोज 24 तास ड्युटी करू शकत नाही. कृपया मला सेवेतून मुक्त करा!" - हे शब्द आहेत उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या एका कॉन्स्टेबलच्या राजीनामा पत्रातले. विशेष म्हणजे, हा राजीनामा त्याने स्टेशनच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवरच पोस्ट केला.

देवगन कुमार चौहान असं या कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्याने 7 सप्टेंबर रोजी व्हॉट्सॲप ग्रुपवर हे राजीनामा पत्र शेअर केलं, ज्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. राजीनाम्यातील वेगळी आणि थेट भाषा पाहून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित स्टेशन ऑफिसर (SHO) आणि कॉन्स्टेबल चौहान या दोघांनाही बोलावून घेतलं आणि या घटनेमागचं कारण विचारलं.

'माझ्यात विशेष शक्ती नाही'

पोलीस आयुक्तांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात चौहानने म्हटलं होतं की, "मी सध्या रोज 24 तास काम करण्याच्या परिस्थितीत नाही. माझ्यात कोणतीही विशेष शक्ती नसल्यामुळे, मला माझ्या ड्युटीतून मुक्त करण्यात यावं, अशी माझी विनंती आहे."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉन्स्टेबल गेल्या काही दिवसांपासून ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या सुरक्षेसाठी सतत ड्युटीवर होता. यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. त्यातच, त्याच्या घरातही काही वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या सुरू होत्या.

ड्युटी वाटपात भेदभावाचा आरोप

एवढंच नाही, तर कॉन्स्टेबल चौहानने आपल्या स्टेशनमधील ड्युटी वाटपाच्या (Duty Allocation) पद्धतीवरही गंभीर आक्षेप घेतला आहे.

ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल (दिवाण) यांच्यावर त्याने मनमानी आणि भेदभावाचा थेट आरोप केला. चौहानच्या म्हणण्यानुसार, "दिवाण त्यांच्या जवळच्या काही कर्मचाऱ्यांना सोपी कामं आणि आराम देतात. पण इतर कॉन्स्टेबलना मात्र दिवस-रात्र सतत २४ तास कामाला जुंपण्याचा प्रयत्न केला जातो." या राजीनामा पत्रामुळे पोलीस दलात मोठी चर्चा सुरू झाली असून, पोलिसांच्या कामाचे तास आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

समुपदेशनानंतर निर्णय मागे

याबद्दल माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) विजय प्रताप सिंह म्हणाले, "कॉन्स्टेबल चौहान 5 सप्टेंबरच्या रात्री आपली ड्युटी संपवून घरी गेला होता. पण दुसऱ्याच दिवशी त्याला पुन्हा ट्रॉमा सेंटरमधील रुग्णासोबत ड्युटीवर जाण्यास सांगण्यात आलं. तो कौटुंबिक समस्यांमुळे आधीच त्रस्त होता, त्यामुळे या तणावातूनच त्याने राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा."

"त्यानंतर फोनवर बोलताना, आपण पोलीस दलातच काम करू इच्छितो, असं त्याने स्पष्ट केलं आहे," असंही एसीपींनी सांगितलं.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर चौहानची समजूत काढण्यात आली आणि त्याला योग्य समुपदेशन (counselling) करण्यात आलं. त्याचा राजीनामा फेटाळण्यात आला असून, तो पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आपली सेवा सुरू ठेवणार आहे.

दरम्यान, व्हॉट्सॲप ग्रुपवरून राजीनाम्याचा मेसेज डिलीट करण्यात आला असला तरी, त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांची कठीण कामाची परिस्थिती आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Career Switch: SBI मॅनेजरची नोकरी सोडून सुरू केला योगा स्टुडिओ, तरुणीचा निर्णय व्हायरल!
Viral Video: गाडीतलं पेट्रोल संपलं, पण १३ वर्षांच्या मुलानं माणुसकीचं 'टँक' फुल केलं!