
Vande Mataram : राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याच्या गायनासंबंधी नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार, 'सर्व सरकारी कार्यक्रम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये तात्काळ प्रभावाने राष्ट्रगीत 'जन गण मन' पूर्वी, 'वंदे मातरम्' गीत पूर्वीच्या २ कडव्यांऐवजी ३ मिनिटे १० सेकंद कालावधीचे संपूर्ण (सर्व ६ कडवी) गाणे किंवा वाजवणे अनिवार्य असेल' असे निर्देश दिले आहेत.
'सरकारच्या पुरस्कार वितरणासह राष्ट्रपती सहभागी होणाऱ्या सर्व समारंभांमध्ये त्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी वंदे मातरम् वाजवले पाहिजे. शाळा-कॉलेजांमध्येही प्रार्थनेच्या वेळी हे गीत गायले पाहिजे. यावेळी अनिवार्यपणे उभे राहिले पाहिजे' असे नवीन नियमावलीत नमूद केले आहे.
मात्र, चित्रपटगृहांमध्ये प्रसारित होणाऱ्या माहितीपट किंवा चित्रपटांच्या मध्ये हे गीत प्रसारित झाल्यास लोकांना/प्रेक्षकांना उभे राहण्याची आवश्यकता नाही.
बंगाली कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या या गीतासंबंधीचा हा आदेश पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झाला आहे. यानंतर भाजप आणि इंडिया आघाडीतील टीएमसी-सीपीएम-काँग्रेस यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत गीताच्या केवळ २ कडव्यांनाच मान्यता होती. उर्वरित ४ कडव्यांना विरोधी पक्षांचा विरोध होता.
'वंदे मातरम्' ही १८७० च्या दशकात बंगाली कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेली एक देशभक्तीपर कविता आहे, जी पहिल्यांदा १८८२ मध्ये त्यांच्या 'आनंदमठ' या बंगाली कादंबरीत प्रकाशित झाली. याच्या सुरुवातीच्या ओळीचा अर्थ 'हे माते, मी तुला वंदन करतो' असा आहे. यात मातृभूमीचा उल्लेख आहे.
स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हे गीत भारतीय राष्ट्रवादाचे एक प्रमुख प्रतीक बनले. १९३७ मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 'वंदे मातरम्'ला राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले, परंतु फक्त पहिली २ कडवी वापरण्याचा निर्णय घेऊन बाकीची वगळली. कारण उर्वरित ४ कडव्यांमध्ये दुर्गा मातेच्या स्तुतीचे अंश होते. एकेश्वरवादी मुस्लिमांचा उर्वरित कडव्यांना विरोध होण्याची शक्यता असल्याने, धर्मनिरपेक्षता जपण्याच्या दृष्टीने गायनातून उर्वरित ४ कडवी वगळण्यात आली.
परंतु, आता १९३७ मध्ये वगळलेली ४ कडवीही अनिवार्यपणे गाण्याचा आदेश देण्यात आला आहे, हे लक्षणीय आहे.
गेल्या वर्षी भाजप नेत्यांनी गीताची उर्वरित ४ कडवी स्वीकारण्याची मागणी केली होती. यामुळे भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. आता सरकारने जारी केलेला आदेश पुन्हा एकदा वादाला तोंड फोडणार आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने एक निवेदन जारी केले आहे, ज्यात म्हटले आहे की, '१९३७ मध्ये, रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार जवाहरलाल नेहरूंनी या गाण्याचे काही भागच स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. नंतर, त्याच भागाला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला. आता भाजप सरकार तो इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रिटिश राजवटीत एक दिवसही तुरुंगात न घालवलेले लोक आता देशभक्तीवर भाषण देत आहेत,' अशी टीका केली आहे.
सीपीएमच्या केंद्रीय समितीने प्रतिक्रिया दिली की, 'देशातील गंभीर समस्यांवरून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने भाजप 'वंदे मातरम्'भोवती एक नवीन कथानक तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.'
मात्र, भाजप नेत्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.
नवीन नियम काय आहेत?
- यापुढे वंदे मातरम् ची सर्व ६ कडवी ३ मिनिटे १० सेकंदात गायली पाहिजेत.
- राष्ट्रपतींचे आगमन, प्रस्थान, ध्वजारोहण, राज्यपालांच्या भाषणावेळी गायन अनिवार्य.
- सर्व शाळा-कॉलेजांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रीय गीत वंदे मातरम् न चुकता गायले पाहिजे.
- राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही गायचे असल्यास, वंदे मातरम् आधी गायले पाहिजे.
- राष्ट्रगीत 'जन गण मन' प्रमाणेच वंदे मातरम् वाजताना उभे राहून सन्मान देणे अनिवार्य आहे.
- चित्रपट किंवा माहितीपटांच्या प्रसारणादरम्यान वंदे मातरम् वाजल्यास उभे राहण्याची गरज नाही.
- सरकारी/खाजगी कार्यक्रमांमध्ये आवश्यक असल्यास गीताची छापील प्रत उपस्थितांना वाटली पाहिजे.
- योग्य शिस्तीने कोणत्याही कार्यक्रमात वंदे मातरम् गायला परवानगी आहे.
- १८७० मध्ये बंगाली कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 'वंदे मातरम्' ही देशभक्तीपर कविता रचली होती.
- याचा अर्थ- 'हे माते, मी तुला वंदन करतो' असा आहे. हे गीत मातृभूमीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आहे.
- स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हे गीत भारतीय राष्ट्रवादाचे एक प्रमुख प्रतीक बनले.
- १९३७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 'वंदे मातरम्'ला राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले.
- या गीतात सहा कडवी आहेत. पण ४ कडव्यांमध्ये दुर्गा मातेच्या स्तुतीचे अंश आहेत.
- मुस्लिमांच्या विरोधामुळे ४ कडवी वगळण्यात आली होती. आता ती चारही कडवी समाविष्ट करून अनिवार्य केली आहेत.