
Vande Bharat Sleeper Train 180 Kmph : 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत विकसित केलेली वंदे भारत एक्सप्रेस ही भारताची एक अभिमानास्पद योजना आहे. उत्तम आराम आणि वेग देणाऱ्या या प्रीमियम सेमी-हाय-स्पीड ट्रेनला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता, संपूर्ण देश ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, त्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ताशी 180 किमी वेगाने धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमधील 'वॉटर टेस्ट' सर्वांनाच चकित करत आहे.
जलद प्रवास, उत्तम आराम आणि आधुनिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेली रात्रीची सेवा असलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळांवर येईल, असे म्हटले जात आहे. प्रशस्त स्लीपर बर्थ, ऑनबोर्ड वाय-फाय, चार्जिंग पॉइंट्स आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले इंटिरियर्स ही या ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत. सध्याच्या स्लीपर ट्रेनपेक्षा अधिक आरामदायक आणि वेगवान प्रवासाची हमी नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन देते.
नुकत्याच झालेल्या चाचणी दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनने ताशी 180 किमीचा वेग गाठला होता. ही चाचणी रोहलखुर्द-इंद्रगड-कोटा मार्गावर घेण्यात आली. यामध्ये ट्रेनची स्थिरता, ब्रेकिंग आणि प्रवासाचा आराम तपासण्यात आला. ट्रेनचे एरोडायनॅमिक डिझाइन, सुधारित सस्पेन्शन आणि उत्तम बोगींमुळे जास्त वेगातही स्थिरता टिकवून ठेवण्यास मदत होते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, ट्रेनच्या आत एका सपाट पृष्ठभागावर पाण्याचे तीन ग्लास ठेवलेले दिसतात. त्याच्या शेजारी ठेवलेल्या फोनवर ट्रेनचा वेग दिसत आहे. ताशी 180 किमी वेगाने धावत असतानाही पाण्याचा एक थेंबही बाहेर सांडत नाही, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. एका व्यक्तीने दोन ग्लासांवर तिसरा ग्लास ठेवला, तरीही तो स्थिर राहिला. मात्र, चाचणी यशस्वी झाली असली तरी, प्रत्यक्ष सेवा सुरू झाल्यावर ट्रेनचा वेग कमी असेल का, अशी शंका अनेकजण व्यक्त करत आहेत.