
नवी दिल्ली : जम्मू आणि कश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माता वैष्णो देवी मंदिराच्या मार्गावर मंगळवारी मोठ्या भूस्खलनाची घटना घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधक्वारीजवळील इंदरप्रस्थ भोजनालय परिसरात हे भूस्खलन झाले असून, काही जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्डने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "इंदरप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलनाची दुर्घटना घडली असून, काही जखमींची शक्यता आहे. बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून आवश्यक यंत्रणा आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत."
जम्मू विभागात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक भागांमध्ये भूस्खलन आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगराळ भागांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
17 ऑगस्ट रोजी कठुआ जिल्ह्यात ढगफुटीमुळे ७ जणांचा मृत्यू, तर ११ जण जखमी झाले होते. या घटनेत मोठ्या प्रमाणावर पूर आणि भूस्खलन झाले, ज्यामुळे पायाभूत सुविधा देखील मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या. 14 ऑगस्ट रोजी किश्तवाड जिल्ह्यात मचैल माता यात्रेदरम्यान आणखी एक ढगफुटीची घटना घडली. यामध्ये किमान ५५ जणांचा बळी गेला आणि पूरपरिस्थितीने यात्रेवर मोठा परिणाम झाला.
वैष्णो देवीच्या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. त्यामुळे अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश दिले गेले आहेत. यात्रेचा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी मदत आणि बचाव पथक सतत काम करत आहे.