
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने एक विशेष तपास पथक (एसआयटी) सोमवारी (२५ ऑगस्ट २०२५) स्थापन केले. या पथकाचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. चेलमेश्वर असतील. या एसआयटीकडे गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या वंतारा या प्राण्यांच्या बचाव व पुनर्वसन केंद्राविरोधातील तक्रारी आणि आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची जबाबदारी असेल.
न्यायमूर्ती पंकज मिठाल आणि पी.बी. वरळे यांच्या खंडपीठासमोर दोन याचिका दाखल झाल्या होत्या. त्यातील एक वकील जया सुकीन यांनी दाखल केली होती. त्यामध्ये भारत आणि परदेशातून बेकायदेशीर पद्धतीने प्राणी आणणे, कैदेत असलेल्या प्राण्यांशी गैरवर्तन करणे, आर्थिक गैरव्यवहार, काळा पैसा पांढरा करणे (मनी लॉन्डरिंग) यांसारखे आरोप करण्यात आले होते.
न्यायालयाने मात्र असे नमूद केले की या याचिका मुख्यतः माध्यमांमधील वृत्तांवर आधारित आहेत. त्यामुळे न्यायाच्या दृष्टीने स्वतंत्र चौकशी आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
न्यायालयाने आदेशात म्हटले की – “ज्यांची प्रामाणिकता निर्दोष आहे, समाजात ज्यांचा सन्मान आहे आणि ज्यांनी दीर्घकाळ सार्वजनिक सेवा केली आहे, अशा व्यक्तींचा समावेश असलेली एसआयटी गठित करणे योग्य ठरेल.”
एसआयटीमध्ये कोण असतील?
न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्यासोबतच या पथकात न्यायमूर्ती राघवेंद्र चौहान (माजी मुख्य न्यायाधीश – उत्तराखंड व तेलंगणा उच्च न्यायालय), हेमंत नगराळे (माजी मुंबई पोलीस आयुक्त, आयपीएस), अनीश गुप्ता (अतिरिक्त आयुक्त, सीमाशुल्क, आयआरएस) यांचा समावेश असेल.
चौकशी कोणत्या बाबींवर होणार?
तसेच, या विशेष पथकाकडे खासगी संग्रह तयार करणे, प्राणी प्रजनन, संवर्धन कार्यक्रम, जैवविविधतेचा वापर, पाणी व कार्बन क्रेडिट्सचा गैरवापर, प्राण्यांच्या व्यापारातील कायद्यांचे उल्लंघन, वन्यजीवांची तस्करी आणि मनी लॉन्डरिंग यासंबंधी आलेल्या तक्रारींचीही तपासणी करण्याचे काम असेल.
एसआयटी याचिकाकर्ते, सरकारी अधिकारी, नियामक संस्था, हस्तक्षेप करणारे, पत्रकार किंवा अन्य कोणीही ज्या व्यक्ती आपले आरोप तपासले जावेत असे इच्छितात, त्यांच्याकडून माहिती मागवू शकते.
न्यायालयाने आदेश दिला की “एसआयटीला जे इतर मुद्दे महत्त्वाचे वाटतील त्यांचीही चौकशी करून संपूर्ण अहवाल न्यायालयात सादर करावा.”
ही चौकशी तातडीने सुरू करून अहवाल १२ सप्टेंबरपर्यंत द्यावा लागेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला होणार आहे.